Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी आजपासून जमीन मोजणी सुरू;९३ टक्के जमिनीच्या संपादनास शेतकऱ्यांची लेखी संमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:24 IST2025-09-26T09:23:26+5:302025-09-26T09:24:52+5:30
- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती, संमती देण्यास मुद्दतवाढ नाही

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी आजपासून जमीन मोजणी सुरू;९३ टक्के जमिनीच्या संपादनास शेतकऱ्यांची लेखी संमती
पुणे :पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे ९३ टक्के जमिनीच्या संपादनाची संमती शेतकऱ्यांनी दिली आहे. संमतीपत्रे सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत गुरुवारी संपुष्टात आली. या मुदतीत विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्र तीन हजार एकरपैकी आज अखेर २ हजार ८१० एकर जागेची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर झाली आहेत. त्यानंतर शुक्रवारपासून (दि. २६) जमीन मोजणीस सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.
पुरंदर तालुक्यातील पारगाव मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभारवळण या सात गावांत विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संमतीपत्रे सादर करण्यासाठी २६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत सुमारे २ हजार ८० शेतकऱ्यांनी एकूण २ हजार ७०० एकर जमिनीच्या संपादनासाठी संमती दर्शविली आहे. मात्र, सुमारे ३०० एकर जमिनीच्या संपादनासाठी संमती आले नव्हते. संमती न दिल्याने या शेतकऱ्यांना विकसित भूखंडाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा, यासाठी ही मुदत आणखी वाढवून द्यावी, अशी मागणी केली होती. ही मुदत गुरुवारपर्यंत (दि. २५) वाढविली होती. त्यानुसार २ हजार ८१० एकर जागेची संमतीपत्रे प्राप्त झाली आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार २२० शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दर्शविली आहे. विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्राच्या ९३ टक्के जागेची संमतीपत्रे सादर झाली आहेत. यानंतर संमतीपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभारवळण येथील गावांमधील जवळपास ९९ टक्के संमतीपत्रे सादर झाली आहेत. तर, पारगाव, येथील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीचे संमतीपत्रे आली आहेत. दरम्यान संमतीपत्रे देण्याची मुदत संपल्यानंतर लगेचच अर्थात शुक्रवारपासून (ता. २६) जमिनीच्या मोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे.
संमतीपत्रे सादर करण्यासाठी दिलेली मुदतवाढ संपली आहे. या मुदतीत २ हजार ८१० एकर जागेची संमतीपत्रे दाखल झाली आहे. संमतीपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.