रखडलेले रुंदीकरण, अतिक्रमण अन् खड्ड्यांमुळे पुणेकरांचा कोंडला श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:45 IST2025-07-31T10:45:02+5:302025-07-31T10:45:28+5:30

- महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभागाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना मनस्ताप

pune news Kondla highways are struggling due to stalled widening, encroachment and potholes | रखडलेले रुंदीकरण, अतिक्रमण अन् खड्ड्यांमुळे पुणेकरांचा कोंडला श्वास

रखडलेले रुंदीकरण, अतिक्रमण अन् खड्ड्यांमुळे पुणेकरांचा कोंडला श्वास

- अंबादास गवंडी

पुणे :
पुणे शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. इतर शहरांतून पुण्याला जोडणाऱ्या महामार्गांवरील कोंडी ही नेहमीचीच समस्या झालेली आहे. सोलापूर ते पुणे, नाशिक ते पुणे, तळेगाव ते शिक्रापूर या महामार्गांचे रुंदीकरण रखडले असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहराच्या प्रवेशद्वारांवर पोहोचताना काही किलाेमीटरच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.

याचा मोठा मनस्ताप पुणेकरांना सोसावा लागत आहे. सरकार आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यासाठी कारणीभूत असून, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हडपसर ते यवत, नाशिक फाटा ते खेड आणि तळेगाव ते शिक्रापूर या महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी केंद्रीय भूपृष्ठ नागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहराला जोडणारे महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीच्या स्थितीबाबत हा आढावा घेतला आहे.

महामार्गावरील वाढता ताण लक्षात घेऊन सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीसाठी शहराच्या चाेहोबाजूंना रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे; परंतु महामार्गावर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडवर उभे केलेली वाहने, वाढते अतिक्रमण, वाढत्या वाहनांची संख्या यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी झाला असून, अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे शहरातील आसपासच्या उपनगरांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते. खरेतर, वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड करण्यात आले आहेत. मात्र, शहरातील चारही बाजूंना असणाऱ्या सर्व महामार्गांवरील सर्व्हिस रोडवर वाहने उभी करण्यात येत असल्याने सर्व्हिस रोडवर खुलेआम अतिक्रमण झाले आहे. सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याने दररोज महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. याकडे महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभागाचे होणारे दुर्लक्ष वाहनधारकांना त्रासदायक ठरत असून, दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे.
 

शहराशेजारी महामार्गांचे वास्तव भयाण

सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई आणि सातारा या बाजूने पुणे शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या खूपच जास्त आहे; परंतु शहराशेजारी असलेल्या या भागातील महामार्गांचे विस्तारीकण झालेले नाही. साेलापूर मार्गावर यवतपर्यंत दुपदरीकरण आहे. तिथून पुढे चाैपदरीकरण आहे. पुणे-अहिल्यानगर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्यानंतरही गेल्या दहा वर्षांपासून रुंदीकरण रखडले असून, सेवा रस्त्याअभावी विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत आहे. नाशिक मार्गाचे खेडपर्यंत रुंदीकरण झाले नाही. पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरण झाले तरी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुणे-सातारा महामार्गाचे काम अजून पूर्ण झाले नाही. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीला आयते आमंत्रण मिळते. पर्यायी वाहतूक कोंडी होते.

 
रिंग रोडचे काम संथगतीने

राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आलेल्या कंपन्यांना अडीच वर्षांत काम पूर्ण करण्याच्या उद्दिष्टानुसार आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित नऊ कंपन्यांनी एकत्रितपणे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून, पश्चिम भागातील ९९ टक्के, तर पूर्व भागातीलही ९८ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे; परंतु शहरातील वाहनसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत रिंग रोडचे काम होताना दिसत नाही.
 

सरकारच्या केवळ घोषणाच

दहा वर्षांपूर्वी अहिल्यानगर महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-अहिल्यानगर मार्गाचे रांजणगावपर्यंत पाच मजली उड्डाणपुलाद्वारे विस्तारीकरण करणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर तीन मजली करण्याची घोषणा करण्यात आली. आता दुमजली उड्डाणपूल करण्याचे नियोजन असल्याचे समजते. त्यांनतर या महामार्गाचे अनेकदा सर्वेक्षण करूनदेखील प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. सरकार केवळ पोकळ घोषणा करून आश्वासन देत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

 
शहरालगत जाणारे महामार्ग

जोडणारे शहर - महामार्ग क्रमांक
पुणे-मुंबई - ४८

पुणे-सातारा - ४८
पुणे-सोलापूर - ६५

पुणे-नाशिक - ६०

Web Title: pune news Kondla highways are struggling due to stalled widening, encroachment and potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.