इयत्ता १० वीपेक्षा कमी शिक्षण असल्याने पोलिस पाटील बापू हुंबे कायमस्वरूपी बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:13 IST2025-10-31T18:12:52+5:302025-10-31T18:13:23+5:30
पोलिस पाटील बापू रामभाऊ हुंबे यांची नियुक्ती डेहन कोंडगाव येथे २४ फेब्रुवारी २०१० रोजी करण्यात आली होती. ही नियुक्ती २०१५ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज करून कार्यकाळ वाढवला.

इयत्ता १० वीपेक्षा कमी शिक्षण असल्याने पोलिस पाटील बापू हुंबे कायमस्वरूपी बडतर्फ
भोर : कोंडगाव (ता. भोर) येथील पोलिस पाटील बापू रामभाऊ हुंबे यांचे शिक्षण इयत्ता १० वी पेक्षा कमी असल्याने त्यांना अपात्र ठरवून उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ केले आहे. याबाबत तक्रार डेहन, कोंडगाव ग्रामपंचायतीने उपविभागीय अधिकारी भोर यांच्या कार्यालयात केली होती.
पोलिस पाटील बापू रामभाऊ हुंबे यांची नियुक्ती डेहन कोंडगाव येथे २४ फेब्रुवारी २०१० रोजी करण्यात आली होती. ही नियुक्ती २०१५ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज करून कार्यकाळ वाढवला.
या मुदतवाढ अर्जासोबत त्यांनी इयत्ता ९ वीचा शैक्षणिक दाखला जोडला होता. दरम्यान, डेहन-कोंडगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा १२ जानेवारीला घेण्यात आली होती. या सभेमध्ये शासकीय अटीप्रमाणे पोलिस पाटील बापू हुंबे हा इयत्ता १० वी पास नसल्यामुळे त्याच्या विरोधात विषय उभा राहिला. ग्रामसभेत बापू हुंबे यास निलंबित करण्याबाबत ठराव झाला. हा ठराव ग्रामपंचायतमार्फत उपविभागीय कार्यालय भोर येथे पाठवण्यात आला. या तक्रारीची लेखी शहानिशा करून उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी बापू हुंबे यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.