कार्तिकी एकादशी : क्षेत्र आळंदीचा लळा..! श्रद्धा भक्तीने फुलला..!! आज ‘श्रीं’ची नगरप्रदक्षिणा; भाविकांची रिघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:44 IST2025-11-15T16:44:00+5:302025-11-15T16:44:00+5:30
- कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणांहून येत असलेल्या शेकडो दिंड्यांनी अलंकापुरीत प्रवेश करून माउलींच्या जयजयकारात प्रदक्षिणा पूर्ण केली.

कार्तिकी एकादशी : क्षेत्र आळंदीचा लळा..! श्रद्धा भक्तीने फुलला..!! आज ‘श्रीं’ची नगरप्रदक्षिणा; भाविकांची रिघ
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा । कृष्णपक्षी तुज निर्धारा, भेट देत जाईन ।। कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरीयात्रा होईल सरशी । दुसरी कृष्णपक्षी निर्धारीसी, तुज दिधली असे ।। या अभंगाप्रमाणे श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अलंकापुरीत भाविकांची रीघ लागली असून, कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला पवित्र इंद्रायणीत स्नान करून ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे वारकरी डोळेभरून दर्शन घेत आहेत. परिणामी माउलींच्या संजीवन समाधी दर्शनाची दर्शनरांग भाविकांनी फुलली आहे. समाधी मंदिरापासून इंद्रायणी नदीच्या स्कायवॉक पुलावरून नदीपलीकडील वाय जंक्शनपर्यंत दर्शनरांग जाऊन पोहचली आहे.
कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणांहून येत असलेल्या शेकडो दिंड्यांनी अलंकापुरीत प्रवेश करून माउलींच्या जयजयकारात प्रदक्षिणा पूर्ण केली. दरम्यान विठूराया, संत नामदेव महाराज, पुंडलिकराया, आळेफाटा येथील रेड्याची पालखी, तसेच केंदूरच्या कान्होराज महाराजांची दिंडी आळंदीत दाखल झाली आहे. याशिवाय वासकर, राशीनकर, शिरवळकर, टेंभूकर यांसारख्या मोठ्या दिंड्यांचे आगमन झाले आहे. पुणे जिल्ह्यासह खान्देश, मराठवाडा, कोकण, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून दिंड्यांचा ओघ सुरू आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी (दि.१४) पहाटे माउलींची नित्यनियमाप्रमाणे पवमान अभिषेक व दुधारती करण्यात आली. पूजेनंतर भाविकांना दर्शन देण्यात आले. दुपारी साडेबाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी साडेचारला विना मंडपात ह.भ.प. गंगुकाका महाराज शिरवळकर यांच्या कीर्तनानंतर विणामंडपात ह.भ.प. धोंडोपंत अत्रे यांचे हरिकीर्तन पार पडले. धुपारतीनंतर रात्री नऊला विणा मंडपात ह.भ.प. वासकर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर रात्री साडेअकरानंतर वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम घेऊन रात्री बाराला कार्तिकी एकादशीच्या मुख्य पूजेला सुरुवात झाली.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१४) माउलींच्या संजीवन समाधीला नवीन पोशाख घातला जाणार आहे. तसेच, माउलींच्या पालखीची शहरातून नगरप्रदक्षिणा पार पडणार आहे. अलंकापुरीत आलेले असंख्य भाविक प्रदक्षिणा सोहळ्यात सहभागी होऊन ज्ञानोबारायांचा जयजयकार करणार आहेत. कार्तिकी एकादशीच्या दिवशी हाच सोहळा भाविक-भक्तांसाठी महत्त्वाचा असतो.
पूजेच्या साहित्यास झळाळी...
मंदिरातील ''श्रीं''चे चांदीचे पूजा साहित्य, भांडी, चांदीचे दोन पालख्या, प्रभावळ, श्रींचा मुख्य गाभारा, श्री सिद्धेश्वर मंदिर चांदीची आभूषणे, पालखी आदींना पॉलिश करून नवी झळाळी देण्यात आली आहे.
आजचे कार्यक्रम
* रात्री १२:३० पासून कार्तिकी एकादशीच्या मुख्य महापूजेस सुरुवात.
* रात्री २ पासून अकरा ब्रम्हवृन्दांच्या वेदघोषात पवमान अभिषेक व दुधारती.
* दुपारी १२ ते १२:३० महानैवेद्य.
* दुपारी १ वाजता ‘श्रीं’ची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडेल.
* रात्री ८:३० धुपारती.
* रात्री १२ ते २ मोझेकरांचा जागर.
१) भाविकांच्या आगमनाने अलंकापुरीचा पवित्र इंद्रायणी घाट गर्दीने फुलला आहे.
२) कार्तिकीच्या पूर्वसंध्येला आळंदीत दाखल होणारे भाविक.
३) माउलींच्या समाधी दर्शनासाठी दर्शनबारीत भाविकांची झालेली गर्दी.
४) कार्तिकी वारीनिमित्त माउलींचे समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले आहे.
५) ज्ञानोबा-माउलींचा गजर करताना वारकरी.
६) सिद्धबेट येथे ज्ञानेश्वरीचे वाचन करताना भाविक.
७) कार्तिकी वारीसाठी आळंदीत दाखल झालेले माळवाले बाबा.