जुन्नरला आरोग्यसेविका व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त; कामाचा ताण वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:24 IST2026-03-27T13:23:58+5:302026-03-27T13:24:15+5:30

१३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ७३ उपकेंद्रे : आरोग्यसेविकांच्या १२४ मंजूर पदांपैकी केवळ ४९ पदे भरलेली

pune news Junnar has vacant posts of health workers and community health officers; Workload has increased | जुन्नरला आरोग्यसेविका व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त; कामाचा ताण वाढला

जुन्नरला आरोग्यसेविका व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त; कामाचा ताण वाढला

- नितीन ससाणे/महेश घोलप 

जुन्नर :  पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने मंजूर केलेल्या पदांच्या तुलनेत प्रत्यक्षात नियुक्त कर्मचारी कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे.

जुन्नर तालुक्यात एकूण १३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ७३ उपकेंद्रे कार्यरत असून त्यांचे व्यवस्थापन पुणे जिल्हा परिषद व जुन्नर पंचायत समितीमार्फत केले जाते. तालुक्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३३ पदे मंजूर असताना त्यापैकी ३० पदे भरलेली असून ३ पदे रिक्त आहेत.

आरोग्यसेविकांची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. एकूण १२४ मंजूर पदांपैकी केवळ ४९ पदे भरलेली असून तब्बल ७५ पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य सेवकांची २७ पदे मंजूर असून त्यापैकी ६७ पदे भरलेली तर ३० पदे रिक्त आहेत. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ६९ पदे मंजूर असून केवळ ३३ पदे भरलेली आहेत, तर ३६ पदे रिक्त आहेत.

उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने प्रशासनाकडून रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा अतिरिक्त ताण जाणवत आहे. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध असल्याने रुग्णांना प्राथमिक उपचार व औषधे दिली जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी ही केंद्रे आधार ठरत आहेत.

मात्र अनेक डॉक्टर आरोग्य केंद्राच्या शासकीय निवासस्थानी राहत नसल्याने रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात. अशा वेळी रात्रपाळीवरील परिचारिका रुग्णांची तपासणी करून प्राथमिक उपचार देतात, गंभीर रुग्णांना मात्र पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागते. रात्रीच्या वेळी तातडीची सेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

ओतूरमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन रखडले

१ १७ कोर्टीचे रुग्णालय बंदच; नागरिकांचा संताप, १ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे उभारण्यात आलेले सुमारे १७ कोटी रुपये खर्चाचे ग्रामीण रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्व सुविधा उपलब्ध असतानाही रुग्णालय सुरू न झाल्याने परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांवरच अवलंबून राहावे लागत आहे.

ओतूर व परिसरातील ३० ते ४० गावांतील रुग्णांना उपचारासाठी ओतूर व मढ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जावे लागते. गंभीर रुग्णांना मात्र नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, मंचर किवा पुणे येथे हलवावे लागते. त्यामुळे उपचारात विलंब होऊन जीवितहानीचा धोका वाढत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ नागरिक संघ, ओतूर यांच्या 5 वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून रुग्णालय तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालय एक महिन्यात सुरू झाले नाही, तर १ मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती खासदार अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार जुन्नर व ओतूर पोलिस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. 

पायाभूत सुविधांचा अभाव

रुग्णालयाच्या इमारतीत काही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. शवविच्छेदन कक्षात पाण्याची कमतरता असल्याने स्वच्छता राखताना अडचणी येतात. तसेच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री रुग्णांना मोठी गैरसोय होते.

शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयातही पदे रिक्त

जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात एकूण २८ पदे मंजूर असून त्यापैकी ६ पदे रिक्त आहेत. दंतशल्य चिकित्सक, साहाय्यक अधीक्षक, प्रयोगशाळा साहाय्यक, कक्षसेवक, नर्सिंग अधिकारी व दंतशल्य साहाय्यक अशी पदे रिक्त आहेत. याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांची १३ पदेही रिक्त्त असल्याचे समोर आले आहे.

या रुग्णालयात जुन्नर तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. रुग्णालयात आवश्यक औषधसाठा उपलब्ध असून सर्पदंश, कुत्र्यांच्या चाव्याचे रुग्ण, न्यायवैद्यक प्रकरणे तसेच क्षयरोग व एचआयव्ही तपासणीसाठीही रुग्ण येत असतात.

एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बाह्यरुग्ण विभागात एकूण ५५ हजार ५६० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २,०९४ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात १७४ नियमित प्रसूती व २४५ शस्त्रक्रियेच्या माध्यमातून प्रसूती करण्यात आल्या आहेत. याशिवाय ६२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, ९ मोठ्या व ६४६ लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्पदंशाच्या ११२ रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. तसेच २,८६६ रुग्णांचे एक्स-रे व २,४९४ रुग्णांचे ईसीजी करण्यात आले असून शवविच्छेदन कक्षात ६६ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Web Title : जुन्नर में स्वास्थ्य सेवाओं में कर्मचारियों की कमी; कार्यभार बढ़ा

Web Summary : जुन्नर के स्वास्थ्य केंद्रों में स्वास्थ्य कार्यकर्ताओं और सामुदायिक स्वास्थ्य अधिकारियों के पद खाली हैं। इस कमी से मौजूदा कर्मचारियों पर दबाव बढ़ रहा है, जिससे मरीजों की देखभाल प्रभावित हो रही है। एक बिना खुले ग्रामीण अस्पताल से नागरिकों में निराशा है, जिससे बेहतर सेवाओं के लिए विरोध प्रदर्शन हो रहे हैं।

Web Title : Junnar Faces Staff Shortage in Health Services; Workload Increases

Web Summary : Junnar's health centers grapple with vacant positions for health workers and community health officers. This shortage strains existing staff, impacting patient care. An unopened rural hospital adds to citizen frustration, prompting protests for improved services.