Jejuri : चैत्र पौर्णिमा यात्रेला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी; ‘येळकोट’च्या जयघोषात दुमदुमला गड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:08 IST2026-04-03T12:07:22+5:302026-04-03T12:08:12+5:30
चैत्र पौर्णिमा हा खंडोबा देवाचा अवतार दिन मानला जात असल्याने भाविकांनी देवाला प्रिय असलेल्या सुगंधी दवण्याची पूजा केली.

Jejuri : चैत्र पौर्णिमा यात्रेला जेजुरी गडावर भाविकांची गर्दी; ‘येळकोट’च्या जयघोषात दुमदुमला गड
जेजुरी : चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली. कुलधर्म-कुलाचारानुसार विविध धार्मिक विधी पार पडत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला.
चैत्र पौर्णिमा हा खंडोबा देवाचा अवतार दिन मानला जात असल्याने भाविकांनी देवाला प्रिय असलेल्या सुगंधी दवण्याची पूजा केली. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मंदिर गाभारा व गडकोटात आकर्षक फुलांची सजावट करून महापूजा करण्यात आली. देवाचे मानकरी सचिन झगडे यांच्या हस्ते दवणा अर्पण करण्यात आला.
पौर्णिमेचा पुण्यकाळ लक्षात घेऊन कालपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली होती. गावोगावच्या शिखर काठ्या वाजत-गाजत गडावर दाखल झाल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी उत्साहात देवदर्शन घेतले.
यात्रेनिमित्त देवदर्शन, तळी भंडारा, जागरण गोंधळ आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. शहरातील बाजारपेठही भाविकांनी फुलून गेली होती. दरम्यान, कडक उन्हाळा, शालेय परीक्षा, गावोगावी सुरू असलेल्या जत्रा व अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर यंदा अपेक्षेपेक्षा भाविकांची संख्या काहीशी कमी असल्याचे दिसून आले.