मुळशी धरणातून तालुक्यासाठी अतिरिक्त पाणी देणे शक्य नाही, राज्य सरकारची भूमिका, पाणी उपलब्ध नसल्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:17 IST2026-03-11T19:16:44+5:302026-03-11T19:17:07+5:30
विधानपरिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना विखे-पाटील यांनी ही माहिती दिली.

मुळशी धरणातून तालुक्यासाठी अतिरिक्त पाणी देणे शक्य नाही, राज्य सरकारची भूमिका, पाणी उपलब्ध नसल्याचे कारण
पुणे : मुळशी धरणातून तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त २ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणी राज्य सरकार फेटाळली आहे. हे धरण टाटा कंपनीच्या मालकीचे असून, यासाठी यापूर्वीच पाणीसाठा आरक्षित आहे. सध्या धरणात अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे सध्या तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
विधानपरिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना विखे-पाटील यांनी ही माहिती दिली. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी डिसेंबर २०२५ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे २ टीएमसी वाढीव पाण्याची मागणी केली होती. यामध्ये मूळशी प्रादेशिक पाणीपुरवठा टप्पा १ व २ मधील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १.२० टीएमसी, तर कोळवण खोऱ्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी ०.८० टीएमसी पाण्याची मागणी केली होती.
त्यावर उत्तर देताना विखे म्हणाले, “मुळशी धरण हे टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि उपलब्धता टाटांमार्फतच होते. हे जलसंपदा विभागाच्या थेट अखत्यारीत येत नाही. याबाबत २००३ मध्ये टाटा कंपनीसोबत झालेल्या करारानुसार, मुळशी डोंगर मध्यम प्रकल्पातून मुळा नदीत १.६४६ टीएमसी पाणी सोडले जाते. यातून पाच हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन आणि पिण्याचे पाणी आरक्षित आहे. सध्याच्या आरक्षित कोट्यामध्ये अतिरिक्त पाणी शिल्लक नसल्याने, नवीन मागणीनुसार पाणी देणे सद्य:स्थितीत शक्य नाही.”