मोबाइलवरून झटपट ऑनलाइन कर्ज ठरतायेत फसवणुकीचा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:08 IST2025-12-05T16:07:47+5:302025-12-05T16:08:14+5:30
- राज्यातील, देशातील किंवा जगातील कोणतीच कंपनी दोन मिनिटांत कर्ज मंजूर करत नाही. सुरुवातीला या ॲपवर अर्जदाराचा पॅन क्रमांक मागितला जातो.

मोबाइलवरून झटपट ऑनलाइन कर्ज ठरतायेत फसवणुकीचा फंडा
- पंढरीनाथ नामुगडे
लोणी काळभोर : मोबाइलवर ऑनलाइन लोन ॲपमधून २० ते ४० मासिक टक्केवारीने घेतलेले कर्ज वसुलीसाठी लोन ॲपकडून ग्राहकांची नाहक बदनामी व मानसिक त्रास देण्याचे प्रकार लोणी काळभोर परिसरात सध्या सुरू आहेत. पीडित ग्राहकाने नाव न छापण्याच्या बोलीवर हा प्रसंग लोकमतशी बोलताना दिला.
पीडित युवकाने मोबाइलवरील लोन ॲपवरून काही ठराविक रक्कम कर्जस्वरूपात घेतली. त्यासाठी त्याने त्या ॲपवर आधार कार्ड, पॅन कार्ड व स्वतःचा सेल्फी तसेच आपल्या मोबाइलमधील लोकेशन, कॉन्टॅक्ट लिस्ट वापरायची परवानगीदेखील त्या ॲपला दिली. परंतु, कर्ज परत करण्याच्या तारखेला कर्ज भरले गेले नसल्याने लोन ॲपवाले त्या युवकास इंटरनॅशनल कॉलवरून धमक्या, शिवागीळ, तसेच कर्ज घेतलेल्या युवकाचे फोटो एडिट करून अश्लील बनवून ते त्याच्या फोन लिस्टमधील लोकांना पाठवत आहेत. परंतु, पीडित युवक समाजात अब्रू जाईल या उद्देशाने पोलिसात तक्रार देत नाहीत.
राज्यातील, देशातील किंवा जगातील कोणतीच कंपनी दोन मिनिटांत कर्ज मंजूर करत नाही. सुरुवातीला या ॲपवर अर्जदाराचा पॅन क्रमांक मागितला जातो. त्यानंतर उत्पन्न विचारले जाते. ही माहिती दिल्यानंतर अर्जदाराने सेल्फी काढून पाठवणे बंधनकारक असते. या काळात अर्जदाराचे जीपीएस कनेक्शन सुरू करून कर्ज देणारी कंपनी लोकेशन पडताळून पाहते. यामुळे तुमचे लोकेशन कंपनीकडे असते. या सर्व गोष्टी ऑनलाइन होत असल्याने ही सगळी प्रक्रिया नेमक्या कोणत्या व्यक्ती करत आहेत, कोठून करत आहेत, याची कोणतीही माहिती कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला नसते. अशा फसवणुकीला बळी न पडण्यासाठी अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. सायबर तक्रारींची नोंद http:/cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाइनवर तत्काळ नोंदवा असे आवाहन सायबर क्राईम पुणे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
कर्ज घेतल्यानंतर नागरिकांना मनस्ताप
कमी वेळात कर्ज देऊ करणारी अनेक ॲप काही छोट्या रकमेची कर्ज देतात. त्यानंतर एका आठवड्याच्या आत ती रक्कम परत केली नाही, तर ते दररोज फोन करून त्रास द्यायला सुरुवात करतात. अनेकदा व्हिडीओ कॉल करून शिवीगाळ करणे, मेसेज करून शिवराळ भाषेत बोलणे, कॉल यादीतील इतर लोकांना कॉल करून त्यांना कर्ज घेतलेल्या व्यक्तीबद्दल बोलणे, अशा अनेक गोष्टी करून अधिकाधिक त्रास देण्याचा प्रयत्न या कंपन्यांनी नेमलेल्या वसुली एजन्सीकडून केला जात आहे.
लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी अशा ऑनलाइन लोन ॲप डाउनलोड करू नये. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला बँक खाते क्रमांक, पॅन नंबर व ओटीपी देऊ नये.फसवणूक झालेल्या नागरिकांनी वेळ न घालवता त्वरित लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार द्यावी. - राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे