राजगुरूनगरमध्ये १८ खासगी क्लासेसची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:09 IST2025-12-17T16:08:39+5:302025-12-17T16:09:00+5:30
ही कारवाई गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथकांमार्फत करण्यात आली.

राजगुरूनगरमध्ये १८ खासगी क्लासेसची तपासणी
राजगुरूनगर : राजगुरूनगर शहरात क्लासमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याची वर्गमित्राने चाकूने हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी शहरातील १८ खासगी नोंदणीकृत शिकवणी क्लासेसची सखोल तपासणी करण्यात आली.
ही कारवाई गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथकांमार्फत करण्यात आली. तपासणीदरम्यान अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृहांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शिक्षक व कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली आदी बाबींची पडताळणी करण्यात आली.
काही क्लासेसमध्ये आवश्यक सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध असल्याचे आढळून आले. मात्र, बहुसंख्य क्लासेसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत नसणे, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत नसणे, स्वच्छतागृहे अस्वच्छ असणे, तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे उपलब्ध नसणे, अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. त्रुटी आढळलेल्या क्लासेसना तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दिलेल्या मुदतीत सुधारणा न केल्यास संबंधित क्लासेसवर नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. ही तपासणी मोहीम आता संपूर्ण खेड तालुक्यात राबविली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, शहरात नोंदणीकृत क्लासेस व्यतिरिक्त गृह सोसायट्या व खासगी घरांमध्ये जवळपास ५० हून अधिक बेकायदेशीर शिकवणी वर्ग सुरू असल्याचे समोर आले असून, याठिकाणी विद्यार्थी सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे अशा क्लासेसवरही कारवाईची मागणी पालकांकडून होत आहे. या तपासणी मोहिमेमुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाने ही कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.