पुणे :पुणे महापालिकेने मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजनेचा १ लाख १४ हजार ९२१ मिळकतधारकांनी लाभ घेतला असून, पालिकेला ७१२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत ७३ कोटी ४६ लाख २५ हजार ७४८ रुपये मिळकतकर जमा झाला आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत १ लाख ३० हजार मिळकतधारकांनी ७८५ कोटी ५९ लाखांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. मात्र, अद्याप सुमारे ३ लाख २० हजार थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेने अभय योजनेला पुन्हा एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
महापालिकेकडून १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत अभय योजना प्रस्तावित करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महापालिकेकडून मिळकतकर दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येत आहे. यापूर्वी २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१ आणि २०२१-२२ या अभय योजनांचा लाभ घेतलेल्या थकबाकीदारांना यंदाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असे सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, नंतर अचानक जुन्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, तरीही अपेक्षित वसुलीचा टप्पा गाठता आलेला नाही.
महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिलपासून मिळकतकराची देयके वितरित केली जातात. सप्टेंबरअखेरपर्यंत मिळकतकर न भरल्यास त्यावर दरमहा दोन टक्के व्याज अथवा दंड आकारला जातो. सध्या महापालिकेकडे सुमारे साडेपाच लाख मिळकतधारकांची एकूण १३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत आहे. त्यातच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील मिळकतकर वसुलीला राज्य सरकारने स्थगिती दिली असल्याने, त्या भागातील नागरिकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात आलेली नाहीत.
पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या चार अभय योजनांपैकी २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ४५८ कोटी ६७ लाख रुपयांची वसुली झाली होती. यंदा दोन महिन्यांसाठी ही योजना राबविण्यात आली. त्यात १५ जानेवारीअखेरपर्यंत ७८५ कोटी ५९ लाखांचा कर या योजनेत मिळाला असून, आज चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या मिळकतकराचे उत्पन्न २ हजार ५८९ कोटी ५९ लाख झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी दिली.
Web Summary : Pune Municipal Corporation extends property tax amnesty scheme to February 15. Over 1.14 lakh property holders benefited, generating ₹712 crore. Despite this, a large amount remains outstanding, prompting the extension. Old beneficiaries are also now included.
Web Summary : पुणे नगर निगम ने संपत्ति कर माफी योजना को 15 फरवरी तक बढ़ाया। 1.14 लाख से अधिक संपत्ति धारकों को लाभ हुआ, जिससे ₹712 करोड़ का राजस्व प्राप्त हुआ। इसके बावजूद, बड़ी राशि बकाया है, जिसके चलते विस्तार किया गया है। पुराने लाभार्थियों को भी अब शामिल किया गया है।