विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण;अवघ्या एका मिनिटासाठी तासाभराची वाहनकोंडी; त्यानंतरही पूल बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 20:45 IST2025-08-20T20:43:59+5:302025-08-20T20:45:15+5:30

या लोकार्पण कार्यक्रमामुळे विधी महाविद्यालयापासून थेट चतु्श्रुंगी पर्यंत किमान तासभर आधी वाहनकोंडी झाली होती.

pune news inauguration of the Vidyapeeth Chowk flyover; Hour-long traffic jam for just one minute; Bridge remains closed even after that | विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण;अवघ्या एका मिनिटासाठी तासाभराची वाहनकोंडी; त्यानंतरही पूल बंदच

विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण;अवघ्या एका मिनिटासाठी तासाभराची वाहनकोंडी; त्यानंतरही पूल बंदच

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. अवघ्या एका मिनिटात कार्यक्रम झाला, पण त्यासाठी चार रस्त्यांवर वाहनकोंडी झाली, काही शे पोलिस बंदोबस्ताला राबले, फ्लेक्स आणि विद्यूत रोषणाईचा झगमगाट झाला पण, पूल सामान्य वाहनधारकांसाठी बंदच राहिला. कशासाठी अशा मोठ्या माननियांना बोलावता असे वैताग वाहनधारक व्यक्त करत होते.

राजभवनकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या पुलाच्या एकाच बाजूचे उदघाटन झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासने, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पीएमआरडीए चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, आयुक्त दीपक सिंगला, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, मुख्य अभियंता रिनाज पठाण, टाटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी यावेळी उपस्थित होते.

या लोकार्पण कार्यक्रमामुळे विधी महाविद्यालयापासून थेट चतु्श्रुंगी पर्यंत किमान तासभर आधी वाहनकोंडी झाली होती. पाषाण कडून, औंधकडून व शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकात येणाऱ्या पुलाखालील तीनही रस्त्यांची स्थिती अशीच होती. पुलाचा लोकार्पण कार्यक्रम पुलावर होता, पुलाखाली मात्र अशी वाहनकोंडी झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार पुलावर आले. आमदार शिरोळे यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष वाहनाने त्यांना वर नेण्यात आले. तिथे त्यांनी कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर पुढे रस्ता खुला करणारी फीत कापली. तोपर्यंत त्यांची वाहने तिथे आलीच होती. त्यात बसून ते लगेचच तिथून पुढे निघूनही गेले.

डॉ. म्हसे यांनी दोन्ही माननियांना पुलाची तसेच या एकूण प्रकल्पाची माहिती दिली. लोकार्पण झाल्यानंतर पूल लगेचच खुला करण्यात येईल अशी नागरिकांची अपेक्षा होती, मात्र पोलिसांनी वाहने नेण्यास मनाई केली. त्याचवेळी सर्व वरिष्ठ अधिकारी, पुढारी यांची चारचाकी वाहने मात्र थेट पुलावर कार्यक्रम होता तिथेपर्यंत जात होती. त्यांना अडवण्यात येत नव्हते.

Web Title: pune news inauguration of the Vidyapeeth Chowk flyover; Hour-long traffic jam for just one minute; Bridge remains closed even after that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.