विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा;पृथ्वीराज चव्हाणांची फडणवीसांवर टीका
By किरण शिंदे | Updated: December 14, 2025 11:51 IST2025-12-14T11:50:20+5:302025-12-14T11:51:12+5:30
विरोधी पक्षनेतेपदावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच सभापती यांच्या मागे लपू नये, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा;पृथ्वीराज चव्हाणांची फडणवीसांवर टीका
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत विरोधी पक्षनेतेपदावर स्थान दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती यांच्या मागे लपू नये. हा सर्व अधिकार त्यांचा आहे. आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल, तर त्यांनी तसंही स्पष्ट सांगावं, असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज पिंपरी-चिंचवड येथे एका कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली. विरोधी पक्षनेतेपदावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच सभापती यांच्या मागे लपू नये, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
महाराष्ट्र सरकारने, मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मोठेपणा दाखवत विरोधी पक्षाला स्थान दिले पाहिजे. विरोधी पक्षनेत्याला एक पद मिळते, कॅबिनेटचा दर्जा मिळतो, तसेच एक कार्यालयही मिळते. विधानसभा अध्यक्ष असोत किंवा सभापती असोत, त्यांच्या मागे मुख्यमंत्र्यांनी लपू नये. हा सर्व अधिकार त्यांचाच आहे.
पंतप्रधान मोदी म्हणतील ते देशात होईल. त्यामुळे बाकी काही नाटक करू नका. करायचं असेल तर लगेच करून टाका, आणि नसेल करायचं तर तसं स्पष्ट सांगून टाका, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.