यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:25 IST2025-08-24T12:25:19+5:302025-08-24T12:25:54+5:30
- पत्नीने पतीसाठी यकृत दान केले होते. मात्र, उपचाराच्या नावाखाली दोघांचेही प्राण गेले.

यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; सह्याद्री हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप
पुणे : सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर (वय ५४) आणि त्यांची पत्नी कामिनी बापू कोमकर (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. पत्नीने पतीसाठी यकृत दान केले होते. मात्र, उपचाराच्या नावाखाली दोघांचेही प्राण गेले.
गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बापू कोमकर यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. आपल्या पतीचे प्राण वाचावेत यासाठी त्यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी, दि.१३ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, केवळ दोन दिवसांतच शुक्रवारी (दि.१५) बापू कोमकर यांचे निधन झाले, तर आठवडाभरानंतर शुक्रवारी दि.२२ ऑगस्ट रोजी कामिनी यांचाही मृत्यू झाला.
या घटनेने कोमकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप केले आहेत. योग्य ती काळजी घेतली असती तर दाम्पत्याचे प्राण वाचले असते, असा आरोप करून त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सह्याद्री हॉस्पिटल हे अत्याधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ओळखले जाते. मात्र, पती-पत्नीचा लागोपाठ मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर आणि डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यकृत प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असली, तरी या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून चौकशी सुरू आहे. पुढील कारवाईकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
शस्त्रक्रिया नियमांनुसार
सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले,यकृत प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. या प्रकरणात रुग्ण एंड-स्टेज लिव्हर डिसीजमुळे उच्च-धोका असलेला होता. प्रोटोकॉलनुसार रुग्ण व कुटुंबीयांना सर्व धोके आधीच समजावून सांगण्यात आले होते. सर्व शस्त्रक्रिया वैद्यकीय नियमांनुसार पार पडल्या. मात्र, प्रत्यारोपणानंतर रुग्णाला ‘कार्डिओजेनिक शॉक’ आला व सर्व प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही. दाता शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीला चांगल्या प्रकारे बरा होत होता.मात्र, सहाव्या दिवशी अचानक ‘हायपोटेन्सिव्ह शॉक’ आला व त्यामुळे ‘मल्टी ऑर्गन डिसफंक्शन’ झाले. प्रगत उपचार असूनही स्थिती नियंत्रणात आणता आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.