गरम मसाल्याचा खिशाला चटका; महिनाभरात दरामध्ये किती वाढ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:53 IST2026-03-22T10:52:49+5:302026-03-22T10:53:07+5:30
मसाल्यात मिरचीमुळे दरवाढीचा भडका : गतवर्षाच्या तुलनेत किलोमागे १०० रुपयांपर्यंत दरवाढ

गरम मसाल्याचा खिशाला चटका; महिनाभरात दरामध्ये किती वाढ?
नीरा ( पुणे जि .) : खडा किंवा गरम मसाल्याच्या भावात सध्या मोठी तेजी आली आहे. लागवडीतील अडचणी, अवकाळी पाऊस आणि जागतिक बाजारातील चढ-उतार यामुळे मसाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. विशेषतः मिरचीच्या दरवाढीचा मोठा परिणाम मसाल्यांवर झाला आहे. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत किलोमागे सुमारे १०० रुपयांपर्यंत तर सरासरी १० ते २० टक्के दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारातील रेडिमेड मसाल्यांमध्ये विविध घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांच्या चवीत फरक पडतो. मात्र, अस्सल चवीसाठी घरगुती मसाल्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. खडा मसाल्याचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याने त्याचा खर्चही वाढलेला आहे.
लग्नसराई, सणवारात मागणी वाढली
लग्नसराई, सणवार आणि रमजानमुळे मसाल्यांची मागणी वाढली आहे. हॉटेल व्यवसाय तसेच घरगुती स्वयंपाकासाठी मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे मसाल्यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कशामुळे मसाल्याचे उत्पादन घटले?
लागवडीदरम्यान काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे धने व जिऱ्याचे नुकसान झाले. त्याचबरोबर बाजारात मसाल्यांच्या साठ्याची कमतरता असल्याने दर वाढले आहेत.
आगामी काळातील भावाचा काय अंदाज?
आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फारसा परिणाम होणार नसला तरी सध्या आवश्यक वस्तूंची मागणी जास्त असल्याने दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
मसाल्यात २५ जिन्नसांचा वापर
गरम तसेच खडा मसाल्यात २५ पेक्षा जास्त जिन्नसांचा वापर केला जातो. यामध्ये धने, शाहाजिरे, लवंग, दालचिनी, जावित्री, दगडफूल, तेजपान, खसखस, काळे मिरे, जिरे, चक्रफूल, रामफळ, सुंठ, वेलची, जायफळ, नागकेशर, हिंग, बडिशेप आदींचा समावेश होतो.
पूर्वीच्या तुलनेत किती रुपयांची वाढ? (प्रतिकिलो दर)
धने : ११० → १६०
शाहाजिरे : १२०० → १६५०
जावित्री : २३०० → ३५००
दगडफूल : ५५० → ८००
चक्रफूल (बादल फूल) : ६५० → ९००
रामपत्री : १६०० → १९००
विलायची : २७०० → ३५००
मिरची
लवंगी : १३५ → २४०
बेगडी : ३५० → ४८०
काश्मिरी : ६०० → ९००
‘मिरची आणि मसाल्यांचा हंगाम सुरू आहे. मोठ्या कंपन्यांची ही मागणी खूप आहे. ऐन हंगामातच आखातात युद्ध याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मसाल्याच्या पदार्थाचे दर हे १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. असंच जर युद्ध चालू राहिलं तर अजून दर वाढतील. शाहाजिरासारखी वस्तू अफगाणिस्तानवरून येते; पण ती सध्या येत नाही.’ - विपुल जैन, मसाला व्यावसायिक, नीरा