हिर्डोशी-वरंधा घाट रस्ता सव्वा महिना बंद; महामार्ग विस्तारकामासाठी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:24 IST2026-03-27T16:24:01+5:302026-03-27T16:24:10+5:30
येणारा पावसाळा लक्षात घेऊन घाटातील उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हिर्डोशी-वरंधा घाट रस्ता सव्वा महिना बंद; महामार्ग विस्तारकामासाठी निर्णय
भोर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी.डी.वरील हिर्डोशी ते वरंधा (कि.मी. ७०/९०० ते ९२/००३) या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता दि. २५ मार्च २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुमारे सव्वा महिना वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पुणे यांनी भोर-महाड रस्त्यावरील कामासाठी उपविभागीय अधिकारी, भोर यांच्याकडे रस्ता बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार भोर तहसील व भोर पोलिस निरीक्षक यांच्या अहवालानंतर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रस्ता सव्वा महिन्यासाठी बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी.डी. वरील भोर तालुक्यातील या भागात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हिर्डोशी ते वरंधा घाट हा दरडप्रवण भाग असून, अनेक ठिकाणी वेडीवाकडी व धोकादायक वळणे आहेत. एकूण २१.१० कि.मी. लांबीच्या कामापैकी सुमारे ३.५० कि.मी. भागात वाहतूक वळवून डीएलसीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र उर्वरित भागात एका बाजूला नीरादेवघर धरणाचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने वाहतूक वळविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. येणारा पावसाळा लक्षात घेऊन घाटातील उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या कालावधीत पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग सुचविण्यात आला आहे. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरूर-सातारा-कराड-कोल्हापूर किंवा राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
महामार्ग पोलिस केंद्र सारोळा येथील पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, या महामार्गाशी धामणदेव, कारुंगण, हिर्डोशी, सोमजाई माळ, टाक्या माळ, वारवंड, शिरगाव, अशिंपी, उंबर्डेवाडी, उंबर्डेगाव आणि शिळीम अशी अनेक गावे जोडलेली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन पूर्णपणे बंद न ठेवता आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.