पाऊस आला अन् धर्माची रेषा मोडून गेला;हिंदु-मुस्लिम जोडप्यांचा विवाह सोहळा रंगला एकाच मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 15:50 IST2025-05-23T15:49:56+5:302025-05-23T15:50:47+5:30
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे घेतली मुस्लिम कुटुंबियांची मदत; दोन्ही धर्मियांच्या एकत्रित जेवणाच्या पंगतीही उठल्या

पाऊस आला अन् धर्माची रेषा मोडून गेला;हिंदु-मुस्लिम जोडप्यांचा विवाह सोहळा रंगला एकाच मंचावर
वानवडी : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे हिंदू- मुस्लिम धर्मियांचा विवाहसोहळा एकाच मंचावर घडून आल्याचा सुखद प्रसंग वानवडीतील लग्नकार्याच्या हॉलमध्ये पाहायला मिळाला. मंगळवारी (दि. २०) अवकाळी पावसाने संपूर्ण पुणे शहराला झोडपून काढले. वानवडीत राज्य राखीव पोलिस दल येथील अलंकारन गार्डनमध्ये मोकळ्या लॉनवर कवडे व गलांडे या हिंदू परिवारांतील विवाहसोहळा सुरू होता.
सायंकाळी ६ वाजून ५६ मिनिटांच्या मुहूर्तावर नवदापत्याचे लग्न लागणार होते; परंतु अवकाळी पावसाने सर्वाचीच धांदल उडाली. पावसाचा जोर वाढत असताना पाहुण्यांनी आडोसा शोधून पावसापासून बचाव केला; परंतु लॉनवर पाणीच पाणी झाले होते आणि पावसाच्या सरी सुरूच होत्या.
सुदैवाने या लॉनशेजारी राज्य राखीव पोलिस दलाचाच अलंकारन हॉल आहे. या हॉलमध्ये मुस्लिम परिवाराचा लग्नसोहळ्याचा स्वागत समारंभ सुरू होता. बाहेर सुरू असलेला पाऊस आणि टळत चाललेला लग्नमुहूर्त या विचारात असताना हिंदू लग्नसोहळ्यातील वडीलधाऱ्या मंडळींनी मनात कोणतीही शंका न ठेवता मुस्लीम काझी परिवाराकडे हॉलमध्ये लग्न लावण्याची परवानगी मागितली. प्रसंग लक्षात घेत मुस्लिम परिवारानेही आढेवेढे न घेता लग्नसोहळा पार पाडण्यास परवानगी दिली. त्यानंतर संस्कृती आणि नरेंद्र यांचा विवाहसोहळा सुखरूप पार पडला.
हिंदू विवाहाच्या सगळ्या विधी उरकल्या. दोन्ही धर्मियांच्या एकत्रित जेवणाच्या पंगतीही उठल्या. विशेष म्हणजे दोन्ही जोडप्यांनी एकत्रित फोटोही काढले. अचानक आलेल्या पावसामुळे लग्नसोहळा व्यवस्थित पार पडतो की नाही, असा प्रश्न कवडे आणि गलांडे पाटील कुटुंबीयांपुढे होता. मात्र मुस्लिम लग्नाच्या समारंभ सोहळ्यातील नातेवाइकांनी साद दिल्याने सर्वकाही सुखरूप पार पडले.
कौतुकाचा वर्षाव
एकीकडे पुणे शहरात बड्या घरातील सुनेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबावर शिंतोडे उडत आहेत, तर दुसरीकडे मुस्लीम परिवाराच्या लग्नसोहळ्यात हिंदू परिवाराचा लग्न सोहळा पार पाडण्यास मुस्लीम परिवाराने मदत केली; त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
नवरा मुलगा गेटवर आला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यावेळी शेजारी असलेल्या अलंकारन हॉलमध्ये मुस्लिम समाजाचा लग्नसोहळा सुरु होता. आम्ही काझी परिवाराकडे आमच्या लग्न सोहळ्यासाठी परवानगी मागितली त्यांनी होकार दिला. - चेतन कवडे, नवरी मुलीचे वडील