Happy New Year 2026 : नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज; पार्ट्यांच्या आयोजनाने थर्टी फर्स्ट साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 20:20 IST2025-12-31T20:20:24+5:302025-12-31T20:20:46+5:30
- हॉटेल्स, पब, रिसॉर्ट्स, फार्महाऊस आणि क्लब बुधवारी रात्रीपासूनच फुल्ल झाले होते.

Happy New Year 2026 : नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज; पार्ट्यांच्या आयोजनाने थर्टी फर्स्ट साजरा
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. जुन्या वर्षांची मावळती रात्र व नव्या वर्षाची उगवती रात्र यांचा मेळ साधत थर्टी फर्स्ट शहरात सगळीकडे जोरदारपणे साजरा झाला. हॉटेल्स, पब, रिसॉर्ट्स, फार्महाऊस आणि क्लब बुधवारी रात्रीपासूनच फुल्ल झाले होते. सायंकाळी ६ वाजेपासून पार्टीचा माहोल सुरू झाला तो रात्री उशीरापर्यंत सुरूच होता. रात्री बरोबर १२ वाजता त्यावर जल्लोषाचा कळस चढला.
तरुणाईमध्ये नववर्ष सेलिब्रेशनबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. डिसेंबरच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी बुकिंग ‘फुल’ झाल्याचे चित्र होते. संगीत, नृत्य, लाईव्ह बँड, डी.जे. नाईट, थीम पार्टी यांचे आयोजन करण्यात आले होते. कोरेगाव पार्क, वाकड, बाणेर, हडपसर, हिंजवडी, कर्वेनगर तसेच पाषाण परिसरातील हॉटेल्स व पबमध्ये आकर्षक थीम पार्ट्यांचे आयोजन केले होते. काही ठिकाणी ‘बॉलीवूड नाईट’, ‘रेनबो पार्टी’, ‘रेट्रो थीम’, तर काही ठिकाणी ‘फॅमिली न्यू इयर डिनर’चे पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय शहराच्या बाहेरील लोणावळा, मुळशी, भोर परिसरातील रिसॉर्ट्समध्ये दोन दिवसांच्या ‘न्यू इयर पॅकेज’लाही मोठी मागणी आहे. मित्रमंडळींसोबत वर्षाचा शेवट जल्लोषात साजरा करण्याची मानसिकता असल्याने खर्चाची तमा न बाळगता अनेकांनी आधीच बुकिंग केले होते. ‘वर्षभर अभ्यास आणि कामाचा ताण असतो. त्यामुळे नववर्षाचे स्वागत ही एक संधी असते, जिथे मित्रांसोबत मनसोक्त एन्जॉय करता येते,” असे महाविद्यालयीन विद्यार्थी ओंकार शिंदे याने सांगितले.
महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही आयोजकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. काही ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही, तसेच ‘सेफ ड्रॉप’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘महिलांसाठी सुरक्षित वातावरण देण्यास आमचे प्राधान्य आहे. यंदा कुटुंबीयांसाठी वेगळे आयोजन केले आहे,” असे एका नामांकित हॉटेलच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
दुसरीकडे, पुणे पोलिसांकडूनही ३१ डिसेंबरच्या रात्री कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई, नाकाबंदी, तसेच प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात होता. ‘नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित पद्धतीने नववर्ष साजरे करावे,’ असे आवाहन वाहतूक पोलिस विभागातील अधिकारी करत होते.