पुण्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला सरकारच जबाबदार; प्रशांत जगताप यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:50 IST2025-07-05T18:49:49+5:302025-07-05T18:50:14+5:30
सलग तीन वेळा मोठे राजकीय पाठबळ देऊनही सत्ताधारी भाजप सरकार पुणे शहराकडे दुर्लक्ष करत आहे

पुण्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला सरकारच जबाबदार; प्रशांत जगताप यांची टीका
पुणे : सलग तीन वेळा मोठे राजकीय पाठबळ देऊनही सत्ताधारी भाजप सरकार पुणे शहराकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच इथल्या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेला तेच जबाबदार आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली.
गुन्हेगार गुन्हा काही सांगून करत नाही, मात्र गुन्हेगारावर वचक असला तर तो गुन्हा करतच नाही. पुण्यात नेमक्या याच गोष्टीची कमी आहे. त्यामुळेच सातत्याने बलात्कार, कोयता गँग, दरोडे असे प्रकार घडत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने पुण्यात वेगवेगळे गुन्हे घडत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जगताप म्हणाले, ‘पुणेकरांनी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान केले. त्यातूनच सलग ३ वेळा लोकसभेत त्यांचा विजय झाला. शहर हद्दीत ८ विधानसभा मतदारसंघातही त्यांनाच यश मिळाले, स्थानिक स्वराज्य संस्थेतही त्यांचीच सलग ५ वर्षे एकहाती सत्ता होती. आता तर केंद्रीय मंत्रिपद, राज्यात दोन मंत्रिपदे अशी सत्तास्थानेही भाजपकडे आहेत. तरीही पुणे शहरातील विकासकामे, पुण्यातील कायदा सुव्यवस्था याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे.’ पुणेकरांनीच आता याचा विचार करावा, असे आवाहन जगताप यांनी केले.