अभय योजनेला थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद; पहिल्या दिवसी ११२७ मिळकतधारकांनी भरली ६.२८ कोटी थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:44 IST2025-11-16T11:43:53+5:302025-11-16T11:44:19+5:30
पहिल्या दिवसी सायंकाळी सहापर्यंत ११२७ मिळकतधारकांनी ६ कोटी २८ लाख रुपये थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा केली.

अभय योजनेला थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद; पहिल्या दिवसी ११२७ मिळकतधारकांनी भरली ६.२८ कोटी थकबाकी
पुणे : महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेला पहिल्याच दिवसी शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसी सायंकाळी सहापर्यंत ११२७ मिळकतधारकांनी ६ कोटी २८ लाख रुपये थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा केली.
महापालिकेची समाविष्ट गावांमध्ये २ हजार कोटी, मोबाइल टॉवरची ४,२५० कोटी आणि जुन्या हद्दीतील, अशी ६ लाख ३७ हजार ६०९ मिळकतींची एकूण १३०९७.११ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत दोन महिने अभय योजना राबविली जाणार आहे. या योजनेतून थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सूट मिळणार आहे. निवासी, बिगर निवासी व मोकळ्या जागा अशा ४.८१ लाख मिळकतींच्या लाभार्थ्यांना अभय योजनेचा फायदा होणार आहे.
या योजनेची सुरुवात शनिवारी झाली. यासाठी महापालिकेची मुख्य इमारत, १५ क्षेत्रीय कार्यालये व ५९ नागरी सुविधा केंद्र आदी ठिकाणी बोर्ड, बॅनर्स, रांगोळी याद्वारे सजावट करण्यात आली होती. यावेळी थकबाकी भरण्यासाठी आलेल्यांचे निरीक्षक व पेठ निरीक्षक यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. दरम्यान, योजनेच्या पहिल्या दिवसी सायंकाळी सहापर्यंत ११२७ मिळकतधारकांनी ६ कोटी २८ लाख रुपये थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा केली.