प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:51 IST2025-11-10T11:51:31+5:302025-11-10T11:51:41+5:30
अबू धाबीला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई या ठिकाणी जावे लागत होते. आता पुण्यातून थेट अबू धाबीला विमान सेवा सुरू होत असल्यामुळे पुणेकर प्रवाशांना फायदा होणार आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा
पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनपुणे ते अबू धाबी ही नवीन आंतरराष्ट्रीय विमान सेवा दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे. याबाबत एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीने शनिवारी (दि. ८) घोषणा केली. पुणे विमानतळावरून हे विमान दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबू धाबी उड्डाण होणार आहे. पुण्यातून रात्री ८.५० वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि अबू धाबी येथे रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात अबू धाबी येथून विमान रात्री ११.४५ वाजता निघेल आणि पुण्यात पहाटे ४.१५ वाजता पोहोचेल, असे एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीने स्पष्ट केले आहे.
सध्या लोहगाव विमानतळावरून दुबई, बँकॉक आणि सिंगापूर या तीन आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहे. आता नव्याने अबू धाबीला आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत आहे. त्याचा फायदा पुणेकर प्रवाशांना होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून युरोप, यूएई यांसारख्या देशांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. तसेच उद्योजकांकडून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा विस्तार करण्यासाठी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीने सिंगापूर, बँकॉक सेवेनंतर आता अबू धाबी येथे विमान सेवेची घोषणा केली आहे. पुण्यातून हे चाैथे आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
पुणे ते अबू धाबी विमानसेवा सुरू होत असल्यामुळे युरोपकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. यामुळे विमानतळ प्रशासनावरील जबाबदारी वाढली आहे. प्रवाशांना सुलभ प्रवासाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळावर प्रशासन कटिबद्ध आहे. - संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
अबू धाबीला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई या ठिकाणी जावे लागत होते. आता पुण्यातून थेट अबू धाबीला विमान सेवा सुरू होत असल्यामुळे पुणेकर प्रवाशांना फायदा होणार आहे. थेट विमानसेवेमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टळणार आहे. भविष्यात पुण्यातून आणखी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात यावी. - आदित्य सोळंकी, व्यावसायिक