सुटीत फिरायला जाताय, आनंदवार्ता; उन्हाळी हंगामासाठी दोन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:54 IST2026-03-03T09:53:48+5:302026-03-03T09:54:19+5:30
खडकी - इंदूर, हडपसर -प्रयागराज गाड्यांचा समावेश

सुटीत फिरायला जाताय, आनंदवार्ता; उन्हाळी हंगामासाठी दोन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ
पुणे : आगामी उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून खडकी इंदूर आणि हडपसर प्रयागराज या दोन गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये इंदूर खडकी इंदूर साप्ताहिक विशेष आणि हडपसर -प्रयागराज साप्ताहिक विशेष गाड्या होळीसाठी सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे या गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, इंदूर, प्रयागराजसह उत्तर व मध्य प्रदेशात जाणाऱ्यांना तिकीट आरक्षण
उपलब्ध झाले आहे.
ट्रेन क्रमांक ०९३२४ इंदूर खडकी विशेष गाडी दि. ४ ते २५ मार्चदरम्यान आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता इंदूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी वाजता खडकी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९३२३ खडकी - इंदूर स्पेशल ट्रेन दि. ५ ते २६ मार्च दरम्यान दर गुरुवारी खडकीहून पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी इंदूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०४१०७ प्रयागराज-हडपसर विशेष ट्रेन दि. २५ मार्चपर्यंत दर बुधवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी प्रयागराज येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता हडपसरला पोहचेल. ट्रेन क्रमांक ०४१०८ हडपसर - प्रयागराज स्पेशल गाडी दि. २६ मार्चपर्यंत दर गुरुवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी हडपसरहून सुटेल आणि शनिवारी (तिसऱ्या दिवशी) सकाळी साडेसहा वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या दोन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ केल्यामुळे अनेक प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. सुटीसाठी प्रवाशांची संख्याही वाढलेली असते.