अवसरी खुर्दच्या चार बहिणी दुबईत अडकल्या; कुटुंबीयांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 15:28 IST2026-03-02T15:28:18+5:302026-03-02T15:28:50+5:30
भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले असून त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील या चार बहिणींचाही समावेश आहे.

अवसरी खुर्दच्या चार बहिणी दुबईत अडकल्या; कुटुंबीयांची चिंता वाढली
अवसरी खुर्द ( पुणे जि.) : मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील विमानसेवा ठप्प झाल्याने अवसरी खुर्द येथील एका महिलेसह तिच्या तीन बहिणी दुबईत अडकल्या आहेत. चारही जणी सुरक्षित असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली असली तरी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संपर्क न झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवसरी खुर्द येथील नंदिनी संजय कसाब यांच्यासह चांडोली येथील सविता गंगाराम बंगाळ, कळंब येथील लता सुहास फलटणे आणि लोकी येथील स्मिता मारुती धिमते या चारही बहिणी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेल्या होत्या. दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढलेल्या युद्धस्थितीमुळे दुबईहून भारताकडे येणारी विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
चारही बहिणींचे परतीचे तिकीट ४ मार्चचे असले तरी सध्याच्या परिस्थितीत विमानसेवा सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले असून त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील या चार बहिणींचाही समावेश आहे.
नंदिनी कसाब यांच्या पती संजय कसाब यांनी सांगितले की, “चारही बहिणी सुरक्षित असल्याचा संदेश मिळाला आहे. मात्र प्रत्यक्ष बोलता आलेले नाही, त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली आहे.” त्यांनी केंद्र सरकारने दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांसाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकही प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून लवकरात लवकर या महिलांना सुरक्षित भारतात परत आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.