Pune Crime : आयुष कोमकर खूनप्रकरणी बंडू आंदेकरसह चौघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 09:28 IST2025-09-10T09:27:00+5:302025-09-10T09:28:59+5:30

- खून प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक

pune news four people including Bandu Andekar arrested in Ayush Komkar murder case | Pune Crime : आयुष कोमकर खूनप्रकरणी बंडू आंदेकरसह चौघे जेरबंद

Pune Crime : आयुष कोमकर खूनप्रकरणी बंडू आंदेकरसह चौघे जेरबंद

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाच्या झालेल्या खून प्रकरणात गुन्हे शाखा व समर्थ पोलिसांनी आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह ४ जणांना बुलढाणा येथून जेरबंद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (६८, रा. नाना पेठ), स्वराज निलंजय वाडेकर (२२, रा. नाना पेठ), वृंदावनी निलंजय वाडेकर (४० , रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, डोके तालीमजवळ), तुषार निलंजय वाडेकर (२६, रा. नाना पेठ) अशी बुलढाणा येथून अटक केलेल्यांची नावे आहेत.

याशिवाय अमन युसूफ पठाण ऊर्फ खान (रा. डोके तालीमजवळ), सुजल राहुल मेरगू (२३) अमित प्रकाश पाटोळे (१९) आणि यश सिद्धेश्वर पाटील (सर्व रा. नाना पेठ) यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (४०, रा. नाना पेठ), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, रा. नाना पेठ), शिवराज उदयकांत आंदेकर (२९, रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, डोके तालीमजवळ), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (३१, रा. नाना पेठ) हे फरार आहेत.

गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. देशमुख म्हणाले यापूर्वी अटक केलेले यश पाटील, अमित पाटोळे तसेच सुजल मेरगू आणि अमन पठाण या चौघांनी लक्ष्मी कॉम्प्लेक्सची रेकी केली होती. यश पाटील आणि अमन पठाण यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला तर अन्य दोघे दुचाकींवर बसून होते. गोळीबार केल्यानंतर दोघेही त्यांच्या दुचाकींवरून पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आंबेगाव पठार येथील सोमनाथ गायकवाड याच्या कुटुंबीयांना आंदेकर टोळीने लक्ष्य केले होते. तो प्रयत्न पोलिसांनी वेळीच हाणून पाडल्यानंतर त्यांनी कोमकर कुटुंबातील तरुणाला टार्गेट केले. आयुष कोमकर हा टोळीप्रमुख बंडू आंदेकर याचा नातू असून तो एमआयटीमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. आंबेगाव पठार येथील आंदेकर टोळीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकर याचा शोध सुरू केला. त्यापूर्वीच तो परराज्यात पळून गेला होता.

ही घटना घडली तेव्हा तो कोची येथे असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखा आणि समर्थ पोलीस या टोळीचा शोध घेत होती. तो बुलढाणा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे पथक काल तिकडे रवाना झाले होते. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात महामार्गावर बंडू आंदेकर याच्यासह चार जणांना पकडले. त्यांना मंगळवारी पहाटे पुण्यात आणले आहे. न्यायालयातून पोलिस कोठडी घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल. त्यातून या प्रकरणातील आणखी काही बाबी स्पष्ट होऊ शकतील, असेही पंकज देशमुख यांनी सांगितले.

Web Title: pune news four people including Bandu Andekar arrested in Ayush Komkar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.