हिंगणीबेर्डी येथे वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:26 IST2025-12-07T17:26:12+5:302025-12-07T17:26:49+5:30
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत.

हिंगणीबेर्डी येथे वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश
देऊळगावराजे : हिंगणीबेर्डी (ता. दौंड) च्या पूर्व भागात दिवसेंदिवस नागरी वस्ती तसेच पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याने येथे मागील पाच दिवसांपूर्वी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातील शिकार टिपण्यासाठी आलेल्या बिबट्याला वन विभागाला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत. यामध्ये हिंगणीबेर्डी येथील हनुमंत छबुराव गोधडे यांच्या शेतातील गोठ्यातील शेळी बिबट्याने ठार केली होती. बोरीबेल येथील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांच्या गायीचे वासरुही बिबट्याच्या शिकार झाले होते. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याचे ठसे दिसून आले आहेत. आज हिंगणीबेर्डी येथील शेतकरी हनुमंत गोधडे यांच्या शेताजवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या पकडण्यात आला आहे.
हिंगणीबेर्डी, शिरापूर, आलेगाव, मलठण आणि बोरिबेल परिसरात शेतकऱ्यांना बिबटे दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामाला मजूर येण्यास नकार देत आहेत. नागरिक आणि शेतकरी बिबट्याच्या भीतीने सायंकाळी लवकर घराकडे परतत आहेत. हिंगणीबेर्डी येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी तालुका वनपरिक्षेत्राधिकारी राहुल काळे, वनरक्षक शुभांगी मुंडे, गोकूळ गवळी, शरद शितोळे, बाळू अडसूळ यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.