मिसिंग लिंक, बाेगद्याचे नेटवर्क अन् एचसीएमटीआरद्वारे वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यावर भर

By राजू हिंगे | Updated: August 13, 2025 14:59 IST2025-08-13T14:59:24+5:302025-08-13T14:59:56+5:30

- वाहतुकीची समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्यावर काम करण्यास प्राधान्य

pune news Focus on solving traffic congestion problem through missing link, tunnel network and HCMTR | मिसिंग लिंक, बाेगद्याचे नेटवर्क अन् एचसीएमटीआरद्वारे वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यावर भर

मिसिंग लिंक, बाेगद्याचे नेटवर्क अन् एचसीएमटीआरद्वारे वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यावर भर

पुणे : पुण्यात अर्बन मोबिलिटी प्लॅन करतानाच बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे अर्बन मोबिलिटी प्लॅनबाबत कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. आता रस्त्यांच्या मिसिंग लिंक, विकास आरखड्यातील बोगद्याचे नेटवर्क आणि हाय कपॅसिटी मास ट्रान्जिट रोडने (एचसीएमटीआर) वाहतुकीची समस्या सोडविण्यावर भर देणार आहोत, असे पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. महापालिकेकडे उपलब्ध असलेला निधी आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन कामाचा क्रम ठरवावा लागणार आहे. वाहतुकीची समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य या चार बाबींवर काम करण्यास प्राधान्य देत आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘लोकमत’तर्फे आयोजित लोकदरबार या उपक्रमात पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी संवाद साधला. त्यावेळी संपादक संजय आवटे उपस्थित होते.

पुणे शहरात नियोजनाअभावी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. देशातील अनेक शहरे वेगवान पद्धतीने प्रगती करत आहेत. मात्र, पुण्यात इतक्या समस्या का आहेत? असा प्रश्न माझ्या मनात आहे. पुणे आता समस्यांचे शहर झाले आहे. अर्बन मोबिलिटी प्लॅन करतानाच बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष झालेले आहे. पुणे शहारात केवळ २ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पुण्यातील रस्त्याचे प्रमाण केवळ १० टक्के आहे. हे प्रमाण किमान २५ टक्के असणे अपेक्षित आहे. शहराच्या आकाराच्या मानाने रस्त्यांची संख्या खूपच कमी आहे. गेल्या आठ वर्षांत पुण्यात व पिंपरी-चिंचवड शहरात वाहनाचे प्रमाण सुमारे ४० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या पुण्यात भेडसावत आहे.

नागपूरसारख्या शहराला रिंग रोड आहे. पण पुण्यात रिंग रोड नाही. शहराच्या विकास आराखड्यातील ६०० कि. मी. रस्ते झालेले नाहीत. शहरातील रस्त्यांच्या मिसिंग लिंकची कामे करणे आवश्यक आहे. दीड वर्षाच्या आत मिसिंग लिंक जोडण्याचा प्रयत्न आहे. त्याने ६७ किलोमीटरचे रस्ते वाढणार आहेत. जोपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहतुकीची समस्या सुटेल असे वाटत नाही.

कात्रज ते कोंढवा रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. २०२६ अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. शिवणे ते खराडी रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे काही रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत आहे. विकास आराखड्यात नियोजन केल्यानुसार बोगद्यांची कामे करावी लागणार आहेत. बोगद्यांच्या कामासाठी सल्लागार नेमणार आहेत. पोलिसांना सोबत घेऊन काम केले तर वाहतुकीची समस्या सुटू शकते. २०२७ पर्यंत विकसित पुणे करण्याचे लक्ष्य आहे, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.
 

नगरसेवक नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी अधिक काम करणे गरजेचे

महापालिकाच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. नगरसेवक खूप चांगले काम करत असतात. नगरसेवक नसल्याने आता क्षेत्रीय कार्यालयाने जास्त काम करणे गरजेचे आहे असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. पालिकेच्या शंभर शाळांना मॉडर्न करण्याचे नियोजन सुरू आहे. पुणे महापालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्याची खूप गरज आहे. पालिकेचे सीबीएसई स्कूल पाहिजे असेही त्यांनी सांगितले.


ड्रेनेज चेंबरचा पुणे पॅटर्न दुसरीकडे दिसणार नाही

शहरात अनेक ठिकाणी पाणी आणि ड्रेनेजच्या लाइन शेजारी, तर वर-खाली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात कुठे ड्रेनेजेचे पाणी मिसळते ही गंभीर गोष्ट आहे. ड्रेनेज चेंबर वर-खाली आहे. हा ड्रेनेज चेंबरचा पुणे पॅटर्न दुसरीकडे दिसणार नाही. त्यामुळे याचा शोध घेण्यास सांगितले आहे. पावसाळी लाइनची कामे करणे गरजेचे आहे. पुण्यात पावसाळी गटारे आणि ड्रेनेजचा सर्व्हे झाला आहे. पण काम होत नाही. पुणे शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. त्यावर काम करणे गरजचे आहे. शहरातील सर्व प्रश्नांचे उत्तर काम करणे हेच आहे. निधीअभावी कामे होत नाहीत, असे म्हणता येणार नाही, असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.
 
पाण्याची गळती रोखण्यासाठी जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे

शहरात नदीसुधार प्रकल्प राबविला जात आहे. एसटीपी प्रकल्प कार्यान्वित होणे आहे. नदी सुशोभीकरणासाठी झाडे तोडली जाऊ नयेत. पालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये पाण्याची समस्या मोठ्याप्रमाणात आहे. नागरिकांना तिथे टँकर लॉबीवर अवंलबून राहावे लागत आहे. तेथे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

त्याच बरोबर बेकायदेशीर नळजोड खूपच जास्त आहे. पाणीमीटर बसविले तर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पाण्याची गळती कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समान पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. ते काम वेगाने करणे गरजेचे आहे, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.
 

टीडीआरची प्रकिया सोपी करणार

महापालिका विविध प्रकल्पांसाठी जागा टीडीआरपोटी ताब्यात घेते, पण टीडीआरची प्रकिया किचकिट आहे. तीन वर्षे टीडीआर मिळत नाही. त्यामुळे जागा मालक टीडीआरपोटी जाग ताब्यात देण्यास टाळाटाळ करत आहे. पुण्यात टीडीआर घोटाळा झाला होता. म्हणून काळजी घेतली पाहिजे. पण सर्व प्रक्रिया जागा मालकानेच का कराव्यात? टीडीआर प्रकिया सोपी केली जाणार आहे. त्याबाबत काम सुरू आहे, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.
 

शहर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य

पालिकेत प्रशासकीय मॉनिटरिंग योग्य नाही. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. पालिका कचऱ्यावर प्रक्रिया जेवढी करते तेवढाच कचरा आपण सांगतो. पण जो कचरा उचललाच जात नाही. जुनीच टेक्नॉलॉजी वापरतो. स्वच्छ संस्थेला नवीन प्रक्रियेत सामावून घ्यायचे आहे. शहरात कचरा जमा करायचा, लोकांना दाखवायचा मग उचलायचा ही पद्धत आहे. झाडणकामासाठी मनुष्यबळ वाढवून शहराला स्वच्छ करून दाखविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.


पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेणार

पुणे महापालिकेत सातवर्षांपेक्षा जास्त सेवाकाल असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हृदय परिवर्तन करण्याची गरज आहे. प्रशिक्षण वर्गाचा चांगला परिणाम होऊ शकतो असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.

Web Title: pune news Focus on solving traffic congestion problem through missing link, tunnel network and HCMTR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.