पाच हजार प्रवाशांनी काढले ‘एमसीएनसी’ कार्ड; पुणे विभागात महिलांचे प्रमाण सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:12 IST2026-03-20T10:12:17+5:302026-03-20T10:12:37+5:30
सवलतीची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि पारदर्शक प्रतिपूर्ती ही तिन्ही वैशिष्ट्ये एकाच कार्डमध्ये आहेत.

पाच हजार प्रवाशांनी काढले ‘एमसीएनसी’ कार्ड; पुणे विभागात महिलांचे प्रमाण सर्वाधिक
पुणे : आधारकार्ड किंवा साधे ओळखपत्र दाखवून निम्म्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला आणि शंभर टक्के सवलतीचा आनंद घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय भविष्यात लालपरीतून प्रवास करताना सवलत बंद होणार आहे. यामुळे पुणे एसटी विभागात गेल्या १० दिवसांत ४ हजार ६९८ महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात असून, त्यांच्या माध्यमातून प्रवासी लालपरीतून सुरक्षित प्रवास करीत आहेत. प्रवाशांची सुविधा लक्षात घेत आता महामंडळाने एनसीएमसी कार्डचा नवा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक होणार असल्याचा दावा केला जात आहे. सवलतीची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि पारदर्शक प्रतिपूर्ती ही तिन्ही वैशिष्ट्ये एकाच कार्डमध्ये आहेत. शिवाय कॅशलेस प्रवासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
बारामती आगार आघाडीवर : पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ६९८ प्रवाशांनी त्यांचे एनसीएमसी कार्डसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये बारामती आगारातून कार्ड काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर स्वारगेट आणि शिवाजीनगर या दोन्ही आगारात अनुक्रमे ४०५ आणि ४०८ जणांनी एनसीएमसी कार्ड काढले आहे. तर भोर आणि मंचर या दोन्ही आगारात कार्डसाठी एजन्सी नेमण्यात न आल्याने या आगारात एकही जण कार्डसाठी अर्ज केले नाही.
महिला आघाडीवर : लालपरीतून सवलतीचा प्रवास ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक व महिलांना करता येतो. यामुळे अशा तीन प्रकारांत हे कार्ड तयार केले जात आहेत. विशेष म्हणजे, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचीच संख्या जास्त दिसते. पुणे विभागात अमृत ज्येष्ठ नागरिक ११९४, ज्येष्ठ नागरिक १२६० आणि महिला सन्मान २१८६ जणांनी कार्ड काढले आहे.
प्रत्येक व्यवहाराची होणार डिजिटल नोंद :
एसटी महामंडळाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, पुरस्कारार्थी अशा सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात; परंतु काही ठिकाणी खोट्या ओळखपत्रांच्या आधारे सवलती घेतल्या जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे शासनाला आर्थिक नुकसान होत होते. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आणि योग्य व्यक्तीलाच सवलत मिळावी, यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डमुळे प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद राहणार आहे.
अशी आहे आकडेवारी :
-महिला सन्मान - २१८६
-ज्येष्ठ नागरिक - १२६०
-ज्येष्ठ नागरिक - ११९४