...अखेर सोमेश्वर कारखाना, दुकानदार वाद मिटला; न्यायालयातील खटले दोन्ही पक्ष काढून घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:55 IST2025-10-26T17:54:42+5:302025-10-26T17:55:18+5:30

शुक्रवारी दुपारपासून सुमारे चार तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर मिटला. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध असलेल्या तक्रारी आणि न्यायालयीन वाद मागे घेण्याचे ठरवले आहे.

pune news finally, Someshwar factory, shopkeeper dispute resolved; Both parties will withdraw court cases | ...अखेर सोमेश्वर कारखाना, दुकानदार वाद मिटला; न्यायालयातील खटले दोन्ही पक्ष काढून घेणार 

...अखेर सोमेश्वर कारखाना, दुकानदार वाद मिटला; न्यायालयातील खटले दोन्ही पक्ष काढून घेणार 

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जागेवरील दुकानदार आणि कारखाना प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद शुक्रवारी दुपारपासून सुमारे चार तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर मिटला. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध असलेल्या तक्रारी आणि न्यायालयीन वाद मागे घेण्याचे ठरवले आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या मालकीच्या जागेवर सुमारे ९० दुकानदार अनेक वर्षे भाडेतत्त्वावर राहत होते. कारखाना स्थापन होत असताना या दुकानदारांना जागा भाड्याने देण्यात आल्या होत्या. मात्र, कारखान्याचे विस्तारीकरण, उपपदार्थ प्रकल्प आणि सहवीजनिर्मिती प्रकल्प केल्यानंतर कारखान्याकडे येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी कारखान्याने दुकानदारांना रस्त्याच्या कडेला विनाअनामत पर्यायी गाळे देण्याचा प्रस्ताव मांडला आणि गाळे सुरू झाल्यानंतर जुनी दुकाने काढण्याचा निर्णय घेतला. परंतु क्षेत्रफळ, भाडे आणि करारनाम्याच्या बाबतीत दुकानदारांची वेगवेगळी मते असल्याने गेल्या दोन महिन्यांत तीन बैठका झाल्या; मात्र एकमत साधले जाऊ शकले नाही.

त्यानंतर, कारखान्याने दुकानापासून काही अंतर सोडून स्वतःच्या जागेत पत्राशेड उभारण्याची तयारी केली. यावर काही दुकानदारांनी कारखान्याच्या कामात अडथळा आणून लोखंडी खांबांचे नुकसान केले. यामुळे कारखान्याने संबंधितांविरुद्ध फौजदारी खटला करण्यासाठी तक्रार दाखल केली. दरम्यान, दुकानदारांनीही न्यायालयाचा मार्ग अवलंबला. त्यामुळे वाद अधिकच चिघळला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी म्हटले की, ‘मी २८ हजार सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही.’ त्यांनी असेही सांगितले की, ‘आमच्या वाडवडिलांनी कारखान्याला जागा दिली; पण आम्ही मालक झालो नाही. त्यामुळे आम्हीही कायदेशीर पद्धतीने कारवाई करू.’

वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पुढाकार घेत सोमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार संतोष शेंडकर, गणेश आळंदीकर, महेश जगताप आणि युवराज खोमणे यांच्या उपस्थितीत दुकानदारांच्या प्रतिनिधींशी – महेश सत्तीगिरी, अमोल जगताप, शेखर कदम आणि सुशांत सोरटे – पोलिस स्टेशनमध्ये चर्चा केली. पहिली चर्चा सकारात्मक झाली. त्यानंतर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पोलिस बंदोबस्तात काम करण्यासाठी विनंती केली. त्यावर सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सर्व दुकानदार आणि संचालक मंडळाची शेवटची एकत्रित बैठक घेण्याची विनंती केली.

त्यानुसार, अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बैठक बोलावली. त्या वेळी दुकानदारांच्या वतीने शशिकांत जेधे, नितीन कुलकर्णी, महेश सत्तेगिरी, सचिन अग्रवाल आणि हेमंत पवार यांनी आपली बाजू मांडली. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पी. एस. आय. राहुल साबळे, पत्रकार संतोष शेंडकर आणि गणेश आळंदीकर यांनीदेखील आपापली मते मांडली. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे आणि माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे यांनी सभासदांच्या वतीने संस्थेचे हित आणि दुकानदारांचे पुनर्वसन यांबाबत योजना मांडली आणि दुकानदारांना वाचून दाखवली.

सदर प्रस्ताव दुकानदारांनी मान्य केला, ज्यामध्ये ३०० चौ. फूट, २०० चौ. फूट आणि १५० चौ. फूट क्षेत्रफळाची गाळे (शेड) बांधण्याचे आणि प्रत्येक गाळ्यापुढे १० फूट वाहनतळ राखण्याचे, तसेच भाडे रु. २० प्रति चौ. फूट निश्चित करण्याचा समावेश आहे. तसेच, १० वर्षांचा करार करण्यात आला. रस्त्याच्या मागील बाजूला ज्यांचे अतिक्रमण असलेले क्षेत्र असेल, त्यांनी ते स्वतः काढून देणे ठरले. दोन्ही पक्षांनी न्यायालय आणि पोलिस स्टेशनमधील सर्व दावे आणि तक्रारी मागे घेण्यास सहमती दिली. दुकानदारांच्या वतीने शशिकांत जेधे यांनी आभार मानले आणि सदर प्रस्तावावर सह्या केल्या. 

Web Title : सोमेश्वर कारखाना, दुकानदार विवाद सुलझा; मामले वापस लिए जाएंगे

Web Summary : सोमेश्वर चीनी कारखाने और दुकानदारों के बीच भूमि विवाद सुलझ गया। दोनों पक्ष सभी शिकायतें और अदालती मामले वापस लेने पर सहमत हुए, जिससे दुकान स्थानांतरण और कारखाने के विस्तार का मार्ग प्रशस्त हो गया।

Web Title : Someshwar Factory, Shopkeepers Dispute Resolved; Cases to be Withdrawn

Web Summary : The Someshwar sugar factory and shopkeepers resolved their land dispute after negotiations. Both parties agreed to withdraw all complaints and court cases, paving the way for shop relocation and factory expansion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.