Video : ओतूरमध्ये पिंजऱ्यात अडकली बिबट मादी; ग्रामस्थांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:04 IST2026-02-19T16:00:47+5:302026-02-19T16:04:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून हांडेबन आणि गाढवपट परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते.

Video : ओतूरमध्ये पिंजऱ्यात अडकली बिबट मादी; ग्रामस्थांना दिलासा
ओतूर ( ता. जुन्नर) : ओतूर परिसरात वाढत्या बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट मादी अडकली. गुरुवार (दि. १९) पहाटे साडेपाचच्या सुमारास गाढवपट परिसरात ही कारवाई यशस्वी ठरली.
गेल्या काही दिवसांपासून हांडेबन आणि गाढवपट परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने सापळा लावला होता आणि अंदाजे १ ते दीड वर्षे वयाची बिबट मादी त्यात अडकली.
घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एम. बुट्टे, वनरक्षक के. एस. खरोडे व किसन केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून बिबट मादीला सुरक्षितपणे माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलवले.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान पिंजऱ्यात हालचाल जाणवत होती. टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता बिबट अडकल्याचे दिसले. त्या वेळी पिंजऱ्याच्या आसपास दुसरी मोठी बिबट मादी आणि पिल्लूही फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली.
वनविभागाने वेळेवर कारवाई केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास घाबरू नये, तात्काळ वनविभागाला कळवावे आणि रात्री एकटे फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.