Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे वळणावर भीषण अपघात; युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:20 IST2025-10-30T15:19:25+5:302025-10-30T15:20:43+5:30
धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळील परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे वळणावर भीषण अपघात; युवकाचा मृत्यू
ओतूर - कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे (ता. जुन्नर) येथील वळणावर गुरुवार (दि. ३० ऑक्टोबर) रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सागर शहाजी चकवे (वय २८, रा. पारगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) या तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की वाहनाचा पुढील भाग पूर्णतः चकनाचूर झाला होता.
अधिकच्या माहितीनूसार, एमएच-१४ केए-११४७ या क्रमांकाची पिकअप गाडी बटाटे घेऊन वाशीच्या दिशेने जात होती. करंजाळे वळणावर चालक सागर चकवे याचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअपने रस्त्याच्या कडेला असलेल्या छत्रपती हॉटेलजवळील भीतीला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळील परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या धडकेनंतर वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. सागर चकवे आणि त्याच्यासोबत असलेला क्लिनर गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या ओतूर पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी दोघांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी सागर चकवे याला मृत घोषित केले. या अपघाताची फिर्याद शुभम शंकर ठोंगिरे (रा. मुथाळणे, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप भोते पुढील तपास करत आहेत. आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या सागरच्या निधनाने मढ पारगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या वळणावर तातडीने स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक, व रस्ता प्रकाशयोजना यांसारख्या सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.