दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेलच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:34 IST2025-10-16T09:33:34+5:302025-10-16T09:34:33+5:30
- शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी केवळ साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेलच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
पुणे : राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशाप्रकारे दिली गेली, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विरोधी पक्ष याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पुण्यात आयोजित एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी केवळ साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यावर विरोधीपक्षदेखील राज्य सरकारवर टीका करत आहे. याबाबत विचारले असता पवार यांनी विरोधी पक्षांचे ते कामच असल्याचे सांगत राज्य सरकार करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल ते कधीही चांगले बोलणार नाहीत, अशी टीका केली.
शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज हे आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज असल्याचा दावा करत पवार यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर त्यातून ते स्पष्ट होईलच, असेही सांगितले. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करील, अशी ग्वाही दिली आहे.
अतिवृष्टीसंदर्भातील अहवाल लवकरच पूर्ण होणार असून अंतिम अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकार मदत करणार असल्याचे शाह यांनी सांगितले आहे. या अहवालात पिकांचे झालेले नुकसान जनावरे, तसेच जीवितहानी, रस्ते, पूल, विहिरी याचे झालेले नुकसान याचा एकत्रित ताळेबंद दिला जाणार आहे.
अहवाल परिपूर्ण झाल्यानंतरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल व त्याचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारची मदत राज्याला मिळेल, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल का याबाबत पवार यांनी यासंदर्भात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना ही मदत कुठल्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे सांगितले.