खेड तालुक्यातील मलघेवाडीत शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास; तराफा वाहून गेल्याने होडी 'हा' एकमेव आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:18 IST2025-12-09T14:18:00+5:302025-12-09T14:18:36+5:30
- मलघेवाडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या दोन्ही काठावर आहे. घरातून थेट शेतावर जायला दोन-तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागतो.

खेड तालुक्यातील मलघेवाडीत शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास; तराफा वाहून गेल्याने होडी 'हा' एकमेव आधार
राजगुरुनगर : मलघेवाडी (ता. खेड) गावाला भीमा नदीतून ये-जा करण्यासाठी जिल्हा परिषदेने होडी दिली होती. ही होडी वर्षापूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेली. मात्र, शेतकऱ्यांनी पाण्यावर चालणारा तराफा तयार केला असून, त्यांना धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. शेतकऱ्यांना होडी मिळावी, अशी मागणी होत आहे.
मलघेवाडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या दोन्ही काठावर आहे. घरातून थेट शेतावर जायला दोन-तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते. म्हणून गावकरी नेहमी नदीतून होडीने ये-जा करायचे. जिल्हा परिषदेनेही त्यांना एक होडी दिली होती, पण त्या होडीला लाइफ जॅकेटसारखे कोणतेही सुरक्षेचे साहित्य नव्हते. तरीही महिला, लहान मुले, शेतमजूर आणि अवजारे घेऊन शेतकरी जीव मुठीत धरून नदी ओलांडायचे. गेल्या पावसाळ्यात मात्र पूर आला आणि एकमेव होडी वाहून गेली.
ती खरपुडी येथील बंधाऱ्याला अडकली, पण परत आणता आली नाही. होडी गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. शेतजमिनीकडे जायचे कसे म्हणून जुने हौद घेऊन तराफा बनवला आणि नदीच्या दोन्ही काठांवर घट्ट दोरी बांधली. आता ही दोरी ओढत-ओढत ते पाण्यातून धोकादायकरीत्या शेतावर जातात आणि परत येत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना होडी मिळाली होती. ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना तराफ्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. शेतकऱ्यांसाठी पुन्हा होडी मिळविण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. - राहुल मलघे, शिवसेना विभागप्रमुख, मलघेवाडी