केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव; उत्पादन खर्च वसूल करणे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:58 IST2025-11-08T15:57:45+5:302025-11-08T15:58:32+5:30
- गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ तीन ते पाच रुपये एवढाच भाव मिळत आहे.

केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव; उत्पादन खर्च वसूल करणे कठीण
नीरा नरसिंहपूर : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रूक ते नरसिंहपूर भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. केळी पिकाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ तीन ते पाच रुपये एवढाच भाव मिळत आहे. ही मागील तीन वर्षांतील सर्वात नीचांकी किंमत असल्याने शेतकरी हताशावस्थेत आहेत.
एकरी उत्पादन खर्च तब्बल दीड ते पावणेदोन लाख रुपये असताना, प्रत्यक्ष उत्पन्न केवळ ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी निर्यातक्षम बॉक्स पॅकिंग मालाला प्रति किलो २० ते २८ रुपये दर मिळत होता, तर देशांतर्गत बाजारातही कधीही १० रुपयांच्या खाली दर जात नव्हता. मात्र, या हंगामात भाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, सध्या केळीचा उत्पादन खर्च एकरी दीड ते पावणेदोन लाख रुपये झाला आहे. सरासरी 20 ते 25 टन उत्पादन होते. मागील महिन्यात प्रति किलो 27 रुपये दर मिळाला होता, पण आता तो केवळ तीन ते पाच रुपयांवर आला आहे. वीस रुपये दर मिळाल्यास नफा न झाला तरी खर्च तरी वसूल होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यांनी शासनाने यावर ठोस व तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी केळीच्या रोपांसाठी फक्त काही निवडक कंपन्या उपलब्ध होत्या; मात्र आता नवीन कंपन्यांची वाढ झाल्याने लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढले. परिणामी उत्पादने अधिक झाली, पण बाजारात मागणी न वाढल्यामुळे भाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि कृषी विभागाने केळी उत्पादकांसाठी तातडीने आधारभाव जाहीर करावा, अन्यथा पुढील हंगामात शेतकरी केळीची लागवड टाळू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली आहे. केळीचे भाव कमी झाल्यामुळे नरसिंहपूर परिसरात शेतकरी राज केळीचे पीक ट्रॅक्टरच्या साह्याने मोडू लागले आहेत.