मुळशीतील केमिकल कंपनीत स्फोट, तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 18:26 IST2025-09-28T18:26:13+5:302025-09-28T18:26:21+5:30
या स्फोटात दोन पुरुष आणि एक महिला भाजून जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

मुळशीतील केमिकल कंपनीत स्फोट, तीन जण जखमी
कोळवण : मुळशी तालुक्यातील अंबडवेट गावातील स्वराज इंटरप्रायझेस या कंपनीत सोडियम क्लोराइडच्या पॅकेजिंगदरम्यान आग लागून स्फोट झाला. ही घटना रविवारी, २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी मारुंजी, हिंजवडी आणि कोथरूड येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविली.
या स्फोटात दोन पुरुष आणि एक महिला भाजून जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये संदीप लक्ष्मण शेंडकर (वय ४९), मोहित राज सुखन चौधरी (वय ४९) आणि रेणुका धनराज गायकवाड (वय ४०) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिता रवळेकर आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमोद बलकवडे यांनी भेट देऊन आग विझविण्याच्या कामात मदत केली. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव करीत आहेत.