डेटिंग साईटचा वापर, महागडे पेग, कोल्ड्रिंगचा खेळ अन् तरूणांना फसवण्याचा नवा ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:53 IST2025-07-17T09:51:38+5:302025-07-17T09:53:24+5:30
वाघोलीतील पबचालकाचा संशयास्पद डाव, डेटिंग साईटचा वापर, तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई नाही

डेटिंग साईटचा वापर, महागडे पेग, कोल्ड्रिंगचा खेळ अन् तरूणांना फसवण्याचा नवा ट्रेंड
- दुर्गेश मोरे
पुणे : डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना फसवण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. तरुणींनी बम्बल डेटिंग ॲपवरून ओळख करून तरुणांना मोहात पाडून वाघोली येथील ‘लाइफ ऑफ डॉरेल्स’ या पबमध्ये नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकारातून संबंधित पबचा व्यवसाय भरभराटीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. दरम्यान, या संदर्भात संबंधित तरुणाने पुराव्यांसह वाघोली पोलिसांकडे लेखी तक्रारही केली. मात्र, महिना होत आला तरी अद्यापही त्यावर पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
जून महिन्यामध्ये एका तरुणाची बम्बल ॲपवरून एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी भेटायचे ठरवले. १९ जून रोजी त्या तरुणीने वाघोलीतील ‘लाइफ ऑफ डॉरेल्स’ या पबमध्ये भेटीचे आमंत्रण दिले. त्यानुसार पबमध्ये पोहोचल्यानंतर संबंधित तरुणीने आठ ते नऊ पेग मद्य मागवले. विशेष म्हणजे, एवढं मद्य पिल्यानंतरही तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसले नाही. थोड्याच वेळात ती अचानक पबमधून निघून गेली. या सगळ्यानंतर पबकडून आकारलेले तब्बल २० हजार रुपयांचे बिल संबंधित तरुणाला भरावे लागले. हे सगळं इतकं लवकर घडलं की त्याला समजून घ्यायची संधीही मिळाली नाही. त्यानंतर दोन्ही वेळेला असेच घडल्याने तरुणाला थोडा संशय आला. घडलेला सर्व प्रकार त्याने आपल्या मित्रांना सांगितला. सर्व मित्रांनी या प्रकाराचा भांडाफोड करण्याचे ठरवले.
२६ जूनला त्याच तरुणाच्या आणखी एका मित्राला त्या डेटिंग साईटवरून मेसेज आला. मात्र, यावेळी सर्वजण सावध होते. संध्याकाळी त्याच पबमध्ये भेटायचे ठरले. यातील काही तरुण आत थांबवले तर काही जण बाहेर थांबले. पबच्या बाहेर दोन कार समवेत काही तरुणी आणि बॉडीगार्डही दिसून आले. त्यानंतर त्या तरुणाने पबमध्ये प्रवेश केला. तरुणीशी भेट झाली. ठरवल्यानुसार त्या तरुणीने ठरावीक ब्रँडच्या मद्याची मागणी केली. काउंटरवरून ते मद्य आल्यानंतर तपासणी केली असता ते कोल्ड्रींक असल्याचे निदर्शनास आले. अन् तेथे उपस्थित असलेल्या तरुणाच्या मित्रांनीही गोंधळ घातला. दरम्यान, डायल ११२ वर संपर्क करून पोलिसांनाही यावेळी बोलावण्यात आले. उपस्थित असलेल्या काही जणांबाबत असाच प्रकार घडत असल्याचे उघकीस आल्याने मोठा गाेंधळ झाला. संबंधित तरुणींनी तेथून पळ काढला. सुरुवातीला पब व्यवस्थापनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली.
प्रकरण मिटवण्यासाठी दबाव
संबंधित फसवणूक झालेल्या तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. घटनेचे व्हिडीओ पुरावे, तक्रार अर्ज आणि साक्षीदार असूनही महिना होत आला तरी पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी पब चालक तसेच पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचे संबंधित तरुणाने सांगितले.
ठरवलेले नाट्य?
या संपूर्ण प्रकारामध्ये तरुणी, पब व्यवस्थापन व स्टाफ यांच्यात संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ओळख करून मद्य मागवणे, महागडे पेग मागवून ते प्रत्यक्षात न पिणे, अचानक गायब होणे, आणि शेवटी बिल भरण्याची जबाबदारी फसवलेल्या तरुणावर टाकणे – हे सारे एक ठरवलेले नाट्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता आयुक्तांनीच लक्ष घालावे
यांसदर्भात वाघोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कधी मिटिंगमध्ये असतात तर कधी त्यांचा दूरध्वनी नॉट रिचेबल असतो. त्यामुळे एकूणच हे प्रकरण संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यापूर्वीही यांसारख्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये हांडे यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे बैठकीत असल्याची उत्तरे मिळाली आहेत. त्यामुळे वाघोलीत नक्की चाललंय तरी काय असा प्रश्नही निर्माण झाला आहे. पैशाची मागणी केली नसतानाही चुकीचे आरोप करण्यात येत असल्याने याप्रकरणी आता थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडेच तक्रार करणार असल्याचे संबंधित तरुणांनी सांगितले.
हा सर्व प्रकार त्या तरुणांनीच घडवून आणला आहे. त्यांनी जी ऑर्डर दिली. त्याप्रमाणेच बिल दिले आहे. ज्या तरुणींबाबत ते बोलत आहे त्या त्यांच्याबरोबर आल्या होत्या. तरूणांनी गोंधळ घातला. यामुळे इतर ग्राहकांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्याने आम्ही नमती भूमिका घेतलीा. मात्र, या प्रकाराबाबत आम्ही वाघोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. - अंकुश दहाटे, मालक, ‘लाइफ ऑफ डॉरेल्स’