पत्नी शिकलेली असली, तरी तिचा सांभाळ करणं नवऱ्याचीच जबाबदारी;पत्नीला २५ हजार रुपये पोटगी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:46 IST2025-11-12T17:45:35+5:302025-11-12T17:46:21+5:30
पती हा पत्नीशी संवादही साधत नसे. एक प्रकारे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.

पत्नी शिकलेली असली, तरी तिचा सांभाळ करणं नवऱ्याचीच जबाबदारी;पत्नीला २५ हजार रुपये पोटगी मंजूर
पुणे : पत्नी ही शिकलेली असली, तरी पतीनेच तिचा सांभाळ करावा. तसेच, पत्नीला लग्नानंतर ज्या सुख सुविधा मिळत होत्या. त्या देण्याची व तिला सांभाळायची कायदेशीर घटनात्मक व नैतिक जवाबदारी देखील नवऱ्याचीच असते, असा निकाल देत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पत्नीला २५ हजार रुपये पोटगी मंजूर केली.
अर्जदार पत्नीने ॲड. प्रसाद विराज निकम व ॲड. मन्सूर तांबोळी यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पती हा पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक असून, पत्नी ही त्याच्यावरच अवलंबून आहे, असे असताना देखील पती हा पत्नीचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करण्याबरोबरच तिला मारहाण सुद्धा करत होता. लग्नानंतर सासरकडची मंडळी तिला दागिने, घरगुती गरजेच्या वस्तू न आणल्याबद्दल पत्नीला टोमणे मारणे आणि अपमान करणे चालू होते. पती हा पत्नीशी संवादही साधत नसे. एक प्रकारे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
ॲड. निकम यांनी युक्तिवाद केला की, पती हा सरकारी कर्मचारी असून, त्याचे उत्तम राहणीमान आहे व त्याच्या सारखेच राहणीमान हे कायद्याने पत्नीचे सुद्धा असावे, असे असताना पती हा पत्नीची देखभाल करत नाही. तसेच, पतीने वैद्यकीय त्रास सुद्धा पत्नीपासून लपवून ठेवले. अशा प्रकारे पत्नीची मानसिक, आर्थिक व शारीरिक हेळसांड करून तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार केलेला आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करीत पत्नीला २५ हजार रुपये प्रतिमहिने देण्याचे आदेश पतीला दिले आहेत. या प्रकरणात ॲड. निकम यांना ॲड. शुभम बोबडे यांनी सहकार्य केले.