सिंहगड रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे;रस्त्यांवर माल विकू दिला जातोय;पण साहेबांचा हप्ता वाढलाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:13 IST2025-07-15T11:11:42+5:302025-07-15T11:13:06+5:30
- फुटपाथ सोडून विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच दुकाने थाटली

सिंहगड रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे;रस्त्यांवर माल विकू दिला जातोय;पण साहेबांचा हप्ता वाढलाय
पुणे : सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणे पुन्हा वाढली असून भाजीपाला व फळविक्रेते व त्यांचे टेम्पो रस्त्याच्या कडेला लावून व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे. परिणामी, रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अधिकारी बदलल्यापासून हप्तेखोरीचे प्रमाण वाढल्याचा संताप काही व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल चौक ते फनटाइम थिएटर यादरम्यान उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून, दुसऱ्या बाजूचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे पदपथ दुरुस्तीचे काम सुरू आहे. अशातच पदपथांवर व रस्त्याच्या कडेला फळे व भाज्या विक्रेते बसत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत आहे. सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणांसंदर्भात तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या रस्त्यांवरील अतिक्रमणे हद्दपार झाली होती. मात्र, भोसले सेवानिवृत्त झाल्यानंतर या रस्त्यावरील पानमळा, पु. ल. देशपांडे उद्यान प्रवेशद्वार, राजाराम पूल चौक, हिंगणे, वडगाव येथील कॅनॉलवरील पूल, अभिरुची, वडगाव खुर्द, नांदेड फाटा येथील कॅनॉलवरील पूल येथे पुन्हा अतिक्रमणे वाढली आहेत. फुटपाथ सोडून विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. भाज्या विकणारे टेम्पो थेट रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करतात, त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे.
कॉर्नरलाच उभे केले जातात टेम्पो
वडगाव येथील कॅनॉलवरील पुलावर रस्ता अरुंद असल्याने तयार झालेल्या बॉटल नेकमुळे याठिकाणी वारंवार वाहतूककोंडी होते. त्यातच कालव्यालगतचा रस्ता सिंहगड रस्त्याला ज्या ठिकाणी मिळतो, तेथेच कॉर्नरवर व कॅनॉलच्या पुलावर भाजी विकणारे टेम्पो उभे राहतात. भाजी घेणारे नागरिक रस्त्यावरच गाड्या उभ्या करून भाजी घेतात. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूककोंडी होते.
अधिकाऱ्यांची हप्ते वसुली जोरात
वडगाव बु. येथील कॅनॉलवरील पुलावर व सिंहगड रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणांचे फोटो सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांना वारंवार पाठवून अतिक्रमण हटवण्याची विनंती केली. मात्र, याकडे मागील दोन ते तीन आठवड्यांपासून दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, अधिकारी बदलल्यापासून विक्रीसाठी थांबू दिले जात आहे, मात्र, हप्ते वाढले आहेत, अशी प्रतिक्रिया काही व्यावसायिकांनी व्यक्त केली.