इन्स्टाग्रामवरील बँक ऑफ इंडिया पेन्शन कार्डच्या नावाखाली वृद्ध महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:44 IST2025-11-25T17:42:07+5:302025-11-25T17:44:13+5:30
महिलेने विश्वास ठेवून पैसे पाठविले. मात्र, पेन्शन कार्ड मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली.

इन्स्टाग्रामवरील बँक ऑफ इंडिया पेन्शन कार्डच्या नावाखाली वृद्ध महिलेची फसवणूक
पुणे : इन्स्टाग्रामवरील ‘बँक ऑफ इंडिया पेन्शन कार्ड’ जाहिरात दाखवून सायबर चोरट्याने पाळेपडळ परिसरातील एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेची ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना उजेडात आली आहे.
याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला ८ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर बँक ऑफ इंडिया पेन्शन कार्ड तयार करून देण्याची जाहिरात दिसली.
ती जाहिरात विश्वासार्ह वाटल्याने त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीने पेन्शन कार्ड प्रक्रियेच्या नावाखाली महिलेकडून आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्डचा फोटो तसेच बँक खात्याची इतर माहिती काढून घेतली. त्यानंतर आरोपीने दोन व्हॉट्सॲप क्रमांकावरून संपर्क साधला. त्यानंतर त्याने त्यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले. महिलेने विश्वास ठेवून पैसे पाठविले. मात्र, पेन्शन कार्ड मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली.