स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:07 IST2026-03-19T13:07:15+5:302026-03-19T13:07:36+5:30
- उर्वरित आठ स्वीकृत नगरसेवकांची नावे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली.

स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त
पुणे : स्वीकृत नगरसेवकपदाचा अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने शिफारस केलेल्या दोन जणांची नावे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली नाहीत. यामुळे ७ पैकी भाजपच्या वाट्याच्या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित आठ स्वीकृत नगरसेवकांची नावे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपचे ११९, दोन्ही राष्ट्रवादी ३०, काँग्रेस १५ आणि उद्धवसेनेचे १ नगरसेवक निवडून आले. पुणे महापालिकेत २०१७ साली स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच होती; पण २०२३ ला राज्य सरकारने या आदेशात बदल केला. त्यानुसार पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता दहा झाली आहे. त्यात भाजपचे ७, राष्ट्रवादीचे २, काँग्रेसचा १ स्वीकृत नगरसेवक असणार आहे. भाजपने शिफारस केलेले प्रियांका शेडगे, जयप्रकाश पुरोहित यांची कागदपत्रे अपुरी असल्याने या दोन जागा पुढील नियुक्ती होईपर्यंत रिक्त राहणार आहेत. या जागांवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याची निवड करण्यात आली. त्यात भाजपचे नीलेश कोंढाळकर, प्रियांका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित, उदय लेले, राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे, राकेश कामठे, काँग्रेसचे सुनील शिंदे यांचा समावेश आहे.