शेतं जलमय, जनजीवन विस्कळीत..! शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:25 IST2025-09-16T17:24:23+5:302025-09-16T17:25:43+5:30
तलावाच्या काठावरून पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि शेंडगेवाडी तलावही तुडुंब भरल्याने खालच्या भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे

शेतं जलमय, जनजीवन विस्कळीत..! शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर
रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले आणि तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. आलेगाव पागा परिसरात पाण्याचा विसर्ग झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आलेगाव पागा येथील प्रसिद्ध तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. तलावाच्या काठावरून पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि शेंडगेवाडी तलावही तुडुंब भरल्याने खालच्या भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरातील ओढ्यावरील बंधारेही पूर्णपणे भरले असून, अनेक शेतांतील माती वाहून गेली आहे. हरिश्चंद्र गुंजाळ यांच्या शेतातील बाजरीचे पीक भुईसपाट झाले असून, लागवड केलेले ऊस पीकही पाण्याबरोबर वाहून गेले आहे. पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
वस्त्यांचा संपर्क तुटला
पावसाच्या पाण्यामुळे गुंजाळ वस्ती आणि मायदर मळा येथील नागरिकांचा गेल्या दोन दिवसांपासून संपर्क तुटला होता. आलेगाव पागा स्मशानभूमीजवळील ओढ्याला महापूर आल्याने भोसले वस्तीतील नागरिकांचाही जनसंपर्क खंडित झाला होता. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता हळूहळू या भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
वाहतूक आणि जनावरांवर परिणाम
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान-मोठे ओढे वाहू लागले असून, काही रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाण्याचा वेग इतका वाढला की, काही शेतकऱ्यांना आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी लागली. बाजरीचे उभे पीक आणि काढलेली बाजरी पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तरीही काही शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे समाधानाची भावना आहे.
प्रशासनाचा इशारा, शेतकऱ्यांची मागणी
प्रशासनाने पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्कतेचा इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून शासकीय मदत मिळावी, अशी मागणी भाऊसाहेब भोसले यांनी केली आहे.