बसस्थानके फुल्ल;सलग सुट्यांमुळे एसटी, रेल्वे अन् खासगी बसला प्रवाशांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:48 IST2025-08-16T12:48:11+5:302025-08-16T12:48:24+5:30
विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवडवरून जाणाऱ्या सर्व भरून जात होते.

बसस्थानके फुल्ल;सलग सुट्यांमुळे एसटी, रेल्वे अन् खासगी बसला प्रवाशांची गर्दी
पुणे : स्वातंत्र्यदिन, गोपाळकाल्यासह रविवार जोडून सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त पुण्यात असलेल्यांनी पर्यटन आणि देवदर्शनाला जाण्यासाठी बाहेर पडले. यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ बसस्थानकात कोंडी झाली होती. एसटी गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे खासगी बसेसलाही प्रवाशांची मोठी गर्दी वाढली होती.
सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे गावी जाण्यासाठी अनेक नियोजन करतात. यामुळे पुणे एसटी विभागातून सर्व मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. संध्याकाळी स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकात कोकण, मराठवाडा, विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विशेषतः विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवडवरून जाणाऱ्या सर्व भरून जात होते. पुणे स्थानकावरून उत्तरेकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने दानापूर, गोरखपूर या मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. उद्या झेंडावंदन नंतर बाहेरगावी जाणाऱ्यांची गर्दी आणखी वाढणार आहे. त्यामुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने कोंडी लक्षात घेऊन नागरिकांनी नियोजन करणे आवश्यक आहे.
बसस्थानके फुल्ल : पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील तीर्थक्षेत्र, देवस्थान आणि पर्यटनस्थळी जाण्यासाठी स्वारगेट आणि शिवाजीनगर एसटी आगारात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामध्ये मुंबई, दादर, कोकण, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर, जळगाव मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक होती. त्यामुळे नियमित गाड्यांचे बुकिंग फुल्ल असल्यामुळे प्रवाशांना एसटीसाठी वाट पाहावी लागत होती.
संगमवाडी, स्वारगेट चौकात प्रवाशांची कोंडी
सलग सुट्यांमुळे एसटी आणि रेल्वेचे बुकिंग फुल्ल आहे. त्यामुळे नागरिकांकडून एसटी, रेल्वेला जागा न मिळाल्याने खासगी बस, ट्रॅव्हल्सला जाणे पसंती दिली. त्यामुळे ट्रॅव्हल्स पाॅइंट असलेले संगमवाडी, सारसबाग (लक्ष्मीनारायण टाॅकीज), पद्मावती चाैक, कात्रज, नवले ब्रीज, चांदणी चौक या व इतर ठिकाणी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे खासगी गाड्याही भरून चालल्या होत्या.
झेंडावंदनानंतर गर्दी आणखी वाढणार
शाळांना सुट्या असल्यामुळे अनेक जण बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले होते. काही कुटुंबीय झेंडावंदननंतर बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे शुक्रवारी महामार्गावर चक्काजाम होऊ शकतो. शिवाय पावसाळा असल्यामुळे पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे अनेक जण चारचाकी बाहेर काढल्याने वाहनांची संख्या भरमसाठ वाढते. परिणामी, पर्यटनासाठी गेलेल्यांनी कोंडीत अडकणार नाही, यासाठी नियोजन करावे लागेल.
असे आहे वाहनांची (सरासरी) आकडेवारी :
पुण्यातून जाणाऱ्या एसटी : १२००
पुण्यात येणाऱ्या एसटी : १०००
विदर्भात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स : ७००
मराठवाड्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स : ६००
कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स : २००