विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांना देण्यात येणार पूर्वसूचना

By नितीन चौधरी | Updated: April 19, 2025 14:41 IST2025-04-19T14:20:31+5:302025-04-19T14:41:05+5:30

सर्व गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे उपोषण केले. प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी त्यात यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर ते मागे घेण्यात आले.

pune news Drone survey for airport in 10 days, farmers will be given advance notice | विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांना देण्यात येणार पूर्वसूचना

विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांना देण्यात येणार पूर्वसूचना

पुणे :पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी करण्यात येणाऱ्या संयुक्त मोजणीसाठी ९ एप्रिलपासून अत्याधुनिक तंत्र म्हणून ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली होती. मात्र, हे सर्वेक्षण आता पुढील १० दिवसांत करण्यात येईल, असे स्पष्टीकरण डुडी यांनी आता दिले आहे. याबाबत संबंधित सातही गावांतील शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मोजणी आणि ड्रोन सर्वेक्षण हे एकाच वेळी होणार आहे.

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये विमानतळ होणारच अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे घेतली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनापूर्वीची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने सातही गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद सभांचे आयोजन केले होते. सुरुवातीला दोन गावांत चर्चा झाली. त्यानंतर सर्व गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे उपोषण केले. प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी त्यात यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर ते मागे घेण्यात आले. मात्र, त्यानंतर झालेल्या संवाद सभांकडे ग्रामस्थांनी पाठ फिरविली.

या सातही गावांतील जमिनीची मोजणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. बागायत, जिरायत जमिनींचे नेमके क्षेत्र, त्यातील झाडांची तसेच विहिरींची संख्या, घरांची संख्या यांचा तपशील ड्रोन सर्व्हेतून संकलित केला जाणार आहे. तत्पूर्वी एमआयडीसीने संयुक्त मोजणीसाठी चार कोटी ८६ लाख रुपयांचे शुल्क भूमिअभिलेख विभागाकडे जमा केले आहे. लवकरच या मोजणीसाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पारगाव गावात बुधवारी रात्री चार-पाच ड्रोनने घिरट्या घालण्यास सुरुवात केल्याचे काही तरुणांनी पाहिले होते. आम्हाला जमीन द्यायची नाही, असे म्हणत एका शेतकऱ्याचा गुरुवारी मृत्यू झाला. त्याबाबत प्रशासनाकडून त्या व्यक्तीच्या मृत्यूचा दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, ड्रोनमुळे मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत डुडी म्हणाले, पुरंदर तालुक्यात विमानतळ करण्यासाठी सरकारने प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. अद्याप सात गावांमध्ये कोठेही सरकारच्या वतीने ड्रोन फिरला नाही अथवा फिरविण्यात आला नाही. येत्या दहा दिवसांत ड्रोनद्वारे सर्व्हे केला जाईल. त्याच वेळी मोजणीही केली जाणार आहे. मोजणी आणि ड्रोन सर्व्हे करण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशासनाकडून माहिती देण्यात येईल. ड्रोन सर्व्हे हा दिवसा करण्यात येतो. तो रात्री करण्यात येत नाही. दिवसा सर्व्हे केल्यानंतर जमिनीत काय आहे, कशा प्रकारची जमीन आहे, हे कळू शकेल. यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news Drone survey for airport in 10 days, farmers will be given advance notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.