पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादा ओलांडण्याचे प्रकार सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:47 IST2025-11-15T14:47:22+5:302025-11-15T14:47:44+5:30
- वेगमर्यादा निश्चित केल्यानंतर अवजड वाहनचालकांकडून सर्रास नियम धुडकावून लावले जात असल्याचे दिसून आले आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादा ओलांडण्याचे प्रकार सुरूच
पुणे : पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान असलेल्या आठ किलोमीटरच्या अंतरात अवजड वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटरवरून ४० किलोमीटर एवढी करण्यात आली आहे. वेगमर्यादा निश्चित केल्यानंतर अवजड वाहनचालकांकडून सर्रास नियम धुडकावून लावले जात असल्याचे दिसून आले आहे.
नवले पुलावर गुरुवारी (दि. १३) साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्याने लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात नऊ ते दहा जण गंभीररित्या जखमी झाले. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात घडलेल्या गंभीर स्वरूपाचे अपघात यापूर्वी घडले आहे. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसर आठ किलोमीटर अंतर तीव्र उताराचे आहे. त्यामुळे या भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवले पूल परिसरात झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत.
नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघात...
वर्ष - अपघात - मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या
२०२१ - २१ - २८
२०२२ - २५ - २७
२०२३ - २२ - ३१
२०२४ - १८ - २०
२०२५ - ०९ - ० ९
(१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५)
११५ जणांचा मृत्यू ...
नवले पूल परिसरात गेल्या पाच वर्षांत ९५ गंभीर अपघात झाले आहेत. या अपघातात ११५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. गेल्या पाच वर्षांत ७२ गंभीर अपघात झाले आहेत. या अपघातात ९४ जण जखमी झाले आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षांत प्राणांतिक, गंभीर, किरकोळ असे एकूण मिळून २५७ अपघात झाले आहेत.