नगर परिषदा, नगर पंचायतींचे प्रारूप प्रभाग १८ ऑगस्टला होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:01 IST2025-07-30T12:01:11+5:302025-07-30T12:01:38+5:30
- २१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना देता येतील

नगर परिषदा, नगर पंचायतींचे प्रारूप प्रभाग १८ ऑगस्टला होणार जाहीर
पुणे : जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या प्रभार रचनांचे प्रारूप आराखडे राज्य सरकार आणि विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. राज्याचा नगर विकास विभाग ही रचना ६ ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. तर १८ ऑगस्ट रोजी ही प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर २१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. देहूरोड नगर पंचायतीची मुदत अद्याप संपलेली नसल्याने या ठिकाणी निवडणूक नाही. जिल्ह्यातील या १४ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींच्या प्रभागांचा प्रारूप आराखडा संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी तयार करून तो जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सादर केला आहे. तर १४ नगर परिषदांचा हा प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करून तो नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. तर तीन नगर पंचायतींचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना अर्थात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पाठविला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांकडून येत्या ६ ऑगस्टपर्यंत हे प्रारूप आराखडे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी प्रभार रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर २१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. नगर परिषदांच्या हरकती व सूचनांवर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. तर नगर पंचायतींच्या हरकती व सूचनांवर २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेण्यात येईल. तर अंतिम प्रभार रचना नगर विकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला ९ ते १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे. त्यानंतर आयोगाकडून मान्यता मिळालेली अंतिम प्रभाग रचना २६ ते ३० सप्टेंबर या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील नगर विकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.