सुसंस्कृत राजकारण करा,पक्षात कुणीही वाईट विधाने करू नका; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:54 IST2025-09-26T15:53:58+5:302025-09-26T15:54:55+5:30
- तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे

सुसंस्कृत राजकारण करा,पक्षात कुणीही वाईट विधाने करू नका; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
पुणे: मागचा अजित पवार आणि आताच्या अजित पवारमध्ये खूप फरक पडला आहे.जस वय वाढत, तस आपल्याला बदलाव लागत, तशी मॅच्युरिटी येते, आपणपूर्वी काही केलं, तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, पण आता आपल्यालाच पांघरून घालायच आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पक्षात कुणीही वाईट विधाने करू नका.कुणी काही वक्तव्य करतात ते वाईट बोलले म्हणून आपण वाईट पद्धतीने उत्तर द्यायचं ही आपली शिकवण नाही. राजकारण सुसंस्कृतपणाने करण्याचा विचार जपा. लोक काही बोलतील तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणा आणि पुढे निघून जा, महत्व देऊ नका असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते, जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील, शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती चिटणीस यासह अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला.अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज ज्या मंडळींचा प्रवेश झाला आहे.त्या सर्वांनी यापुढील काळात एकत्रित काम करायच आहे. आपल्या प्रत्येकाला एकमेकांचे स्वभाव, काम करण्याची पद्धत आणि मत देखील माहिती आहे. पण अजित पवाराला भेटावं की नाही. त्याचा मूड आहे की नाही, हे जालिंदरला चांगलाच माहिती आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणुन तुम्ही इकडे तिकडे काही बोललात की त्याचा परिणाम पक्षावर होतो. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सांगत आहे की सुसंस्कृतपणाने बोला. ज्याला आपण पक्षात घेत आहोत त्याची प्रतिमा जनमाणसात चांगली असली पाहिजे. त्याच्यावर चुकीचे आरोप किंवा चुकीचे केसेस नसावेत. लोकांकडे जाताना आपल्याला विश्वासाने जाता यायला पाहिजे असेही अजित पवार यांनी सांगितले.
मला चुलता पुतण्याचं नको सांगू
भाजपचे नेते जालिंदर कामठे यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर अजित पवार भाषण करतेवेळी व्यासपीठाकडे पाहत म्हणाले, राकेश कामठे कुठ आहे.तू काही मनाला लावून घेऊ नकोस, कामठे कामठे भावकी एकत्र आलेली आहे. त्याच वेळी खालून एक कार्यकर्ता म्हणाला, चुलत्या पुतण्याच नात आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, चुलता पुतण्याचं तू मला नको सांगू मागच्या पिढीच नको सांगू आणि आताच्या ही पिढीच नको सांगू, आणि पुढच्या पिढीच देखील नको सांगू, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.