शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिशा कृषी उन्नती अभियान महत्त्वपूर्ण : जितेंद्र डुडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:21 IST2026-03-11T19:20:35+5:302026-03-11T19:21:36+5:30
- शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना मास्टर प्रशिक्षक, यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी.

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिशा कृषी उन्नती अभियान महत्त्वपूर्ण : जितेंद्र डुडी
पुणे : ‘शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणे, त्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी दिशा कृषी उन्नती अभियान महत्त्वाचे आहे. हे अभियान यशस्वी करण्याकरिता गाव पातळीवर शेतकऱ्यांचे गट तयार करा, त्यांना प्रशिक्षित शेतकऱ्यांमधूनच गावातच मास्टर प्रशिक्षक तयार करा, निर्यातदारांची साखळी तयार करून शेतकऱ्यांना निर्यातक्षम कृषी उत्पादन घेण्याकरिता कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
दिशा कृषी उन्नतीची या योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. धीरज शिंदे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते. डुडी म्हणाले, ‘जिल्ह्यात ‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ हा आराखडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल, करडई, डाळिंब, सीताफळ आणि द्राक्ष या पिकांचे क्लस्टर करण्यावर भर देण्यात येत आहे.
निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग, आत्मा यंत्रणेने कृषितज्ज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कालबद्ध कार्यक्रम राबवून अधिकाधिक पिकांची निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. या पिकांना सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाणी, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ, निर्यातसाखळी तयार करून निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कामे करावी लागणार आहेत.’
शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना मास्टर प्रशिक्षक, यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे तांत्रिक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. तालुका मंडळ अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्मिती करावी. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी विभाग प्रयत्नशील असून, याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही डुडी यांनी दिली. काचोळे म्हणाले, ‘या अभियानांतर्गत केळी, आंबा, अंजीर, स्टॉबेरी, द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. येत्या काळात सूर्यफूल, करडई, सीताफळाखालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे.’