भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का? सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:12 IST2025-09-12T12:12:31+5:302025-09-12T12:12:57+5:30
- विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सरकारकडून निधी डावलला जातो

भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का? सुप्रिया सुळेंचा सवाल
पुणे : केंद्र सरकारकडून जलजीवन मिशनसाठी निधी मिळत असला तरी राज्य सरकार विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामांना निधी देत नाही, ही अस्वस्थ करणारी बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जलजीवन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी ७० टक्के कामे अद्याप अपूर्ण असल्याचे नमूद केले. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.
क्रिकेट सामन्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, “एकीकडे पाणी देत नाही म्हणायचे आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायचे? भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का?” अशी विचारणा त्या केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत गोंधळ
मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढण्यात आल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. सरकारमधील काही लोक वेगवेगळी विधाने करीत असून, यामुळे वातावरण बिघडत आहे. सरकारने कटुता वाढवू नये, असे सुळे म्हणाल्या. याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
राज ठाकरे यांचे स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, “समविचारी पक्षासोबत जाण्यास काहीच हरकत नाही. राज ठाकरे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे.” काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्ही अनेकदा स्वतंत्र लढलो आहोत, त्यामुळे ठाकरे गटाबाबत आम्हाला कोणतीही अडचण नाही, असेही त्या म्हणाल्या.