पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:09 IST2025-03-29T13:09:09+5:302025-03-29T13:09:57+5:30
सातबारा नोंदीसाठी पैशाची मागणी केल्याची अजित पवारांकडे कार्यकर्त्याची तक्रार

पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान
बारामती :बारामतीत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना एवढ्या सुविधा देतो. सगळ्यांना जे काही पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो. इथे येताना नव्या पैशाचा खर्च येत नाही. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जात आहे. आता आठवा वेतन आयोग आल्यावर ताे द्यावा लागणार आहे. तरीही कामे करताना पैशाची कशासाठी मागणी करता. हे असलं काही अजिबात खपवून घेणार नाही. कोणीही कोणाच्याही वशिल्याने आलेला असला तरी मला काहीही घेणं-देणं नाही. काही जण फार सोकावलेले आहेत. त्यामुळे लक्ष घालून अशा लोकांना सरळ केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामे करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुनावले.
बारामती येथे शुक्रवारी (दि. २८) एका आयोजित कार्यक्रमात पवार यांनी घडलेला किस्सा कथन करताना संबंधितांना निर्वाणीचा इशारा दिला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, माळेगाव येथे एका ठिकाणी गेलो होताे. यावेळी माझ्या जवळचा कार्यकर्ता भेटला. यावेळी त्या कार्यकर्त्याने सातबारावर जमिनीची नोंद करण्याच्या साध्या कामासाठी तलाठी का कोण त्याने १५ हजारांची मागणी केल्याची तक्रार माझ्याकडे केली आहे. त्या संबंधित तलाठी यांना बोलावले आहे. त्याचा बंदोबस्तच करणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी एवढा कडक वागूनदेखील निवडणुकीदरम्यान मलिदा गँगचा झालेल्या उल्लेखाची आठवण काढली. एक तर मलिदा गँगमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मी बारामतीच्या विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आणतो. हे सर्व आपण सर्वसामान्यांसाठी करतो. मात्र, काही पुढारी मला काम द्या, मला कुठलेतरी टेंडर देण्याची मागणी करतात. त्यामुळे ज्याला पुढारपणा करायचा आहे, त्याने ठेकेदारी करू नये आणि ज्याला ठेकेदारी करायची आहे त्याने पुढारपण करू नये, असे पवार यांनी सुनावले.
नीरा डावा कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी तीन हत्ती चौकातील पूल उंच करावा लागला. त्यावेळी माझ्यावर मोठी टीका झाली. काहींनी पाहणीसाठी या कामाची माहिती नसणारी माणसे बाहेरून आणली. मी पहाटे पाचला उठून सहाला पाहणी करतो. त्यावेळी अनेकजण साखरझोपेत असतात. आपण काम करताना कुठे चुका झाल्या तर त्या दुरुस्तही करतो. मार्ग काढतो, ड्रोनद्वारे पाहणी करून पुलावरील वाहतुकीचे नियोजन करण्याची दक्षता घेतली, असा टोला अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला. बारामतीकरांनी चुकीच्या दिशेने वाहने नेऊ नयेत, असा सल्लादेखील यावेळी अजित पवार यांनी दिला.
शिल्लक बेडची माहिती एका क्लिकवर
वैद्यकीय क्षेत्रासाठी नुकताच एक कायदा ‘पास’ केला आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी राखीव जागा ठेवणे आवश्यक आहे; पण काही जण गडबड करीत होते. पण आता कोणालाही यातून पळवाट काढता येणार नाही. कारण, मंत्रालयस्तरावर एका ‘क्लिक’वर शिल्लक बेडची माहिती ‘सीएम’ आणि ‘डीसीएम’ना आता समजणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीटबेल्टबाबत दंडात्मक कारवाईचा कायदा कडक केल्याचे पत्र एकाने मला पाठविले. वास्तविक, ‘गडकरीसाहेबां’नी तो कायदा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणला आहे. सीटबेल्ट, हेल्मेट वापरून कारवाई टाळण्याची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी सूचना अजित पवार यांनी केली.