उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही; हिंजवडीतील विधानावर ग्रामस्थ संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:55 IST2025-07-27T12:52:16+5:302025-07-27T12:55:24+5:30
हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. शनिवारी सकाळी पवार हिंजवडीत आले असता, स्थानिकांनीही आपली मते मांडली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही; हिंजवडीतील विधानावर ग्रामस्थ संतप्त
हिंजवडी : हिंजवडी विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. त्यावेळी हिंजवडीकर स्थानिकांनी प्रश्न मांडले. त्यावेळी पवार यांनी हिंजवडीकरांचे कान टोचले. याबाबत ‘उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही’, अशी नाराजी हिंजवडीकरांनी व्यक्त केली आहे.
हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. शनिवारी सकाळी पवार हिंजवडीत आले असता, स्थानिकांनीही आपली मते मांडली. त्यावेळी पवार यांनी प्रश्न मांडणाऱ्यांचे कान टोचले. ‘नेत्यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही’, अशा भावना व्यक्त करत या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडीची समस्या सुटली पाहिजे, ह्याच्याशी आम्हीसुद्धा सहमत आहे. किंबहुना तशी आमची मागणीसुद्धा आहे. मात्र, रस्ता रुंदीकरण करताना किमान गावठाण भागात स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे आणि त्यांचा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. - सचिन आढाव, ग्रामस्थ, माण
आज अजित पवार हे पाहणी दौरा करण्यासाठी आले होते. त्यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही. अधिकाऱ्यांनी त्यांना जे सांगितले होते, त्यानुसार, ३६ मीटर रस्ता होणार त्यात काही बदल होणार नाही, असं सांगितलं. यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
- शिवाजी भिलारे, ग्रामस्थ, माणमाण-हिंजवडी रस्ता प्रशस्त व्हावा, असं आम्हाला सुद्धा वाटतं. मात्र, किमान काही ठिकाणी, काय अडचण आहे, याबाबत पवार यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे जरा ऐकून घेणे गरजेचे आहे. - पांडुरंग राक्षे, ग्रामस्थ, माण
मागील २१ वर्षांपासून आयटी पार्क टप्पा क्रमांक चारसाठी प्रस्तावित भूसपादनांचे शेरे आमच्या सातबारावर दाखल आहेत. परंतु, वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत आमच्या सातबारावरील शिक्का कमी झालेला नाही. याकडेही पवार यांनी एवढेच आक्रमक होऊन लक्ष देणे गरजेचे आहे. - मल्हारी बोडके, सचिव, माण गाव बचाव कृती समिती
हिंजवडी सरपंचांनी हिंजवडी गावठाण रस्ता रुंदीकरणाबाबत काही ग्रामस्थांच्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार यांनी ते व्यवस्थित ऐकून घेतले नाही. त्यांनी किमान ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेणे गरजेचे आहे. - विक्रम साखरे, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, हिंजवडी