आळेफाटा परिसरात अवैध मुरूम उत्खननामुळे कोट्यवधींचा महसूल बुडीत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:59 IST2026-03-17T12:56:08+5:302026-03-17T12:59:08+5:30

- अनेक वाहने ओव्हरलोड स्थितीत सुसाट धावत असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान..

pune news crores of revenue lost due to illegal mining of murrum | आळेफाटा परिसरात अवैध मुरूम उत्खननामुळे कोट्यवधींचा महसूल बुडीत  

आळेफाटा परिसरात अवैध मुरूम उत्खननामुळे कोट्यवधींचा महसूल बुडीत  

आळेफाटा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील आळेफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा मुरूम उत्खनन सुरू असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गायरान आणि पडसर जमिनींवर मुरूम माफियांची नजर असून, रात्रीच्या वेळेस तसेच शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

पंचक्रोशीत अवैध गौण खनिज माफियांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र दिसत आहे. हजारो ब्रास मुरूमची वाहतूक कल्याण‑अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग मार्गे दिवस-रात्र सुरू असल्याचे आढळले आहे. अनेक वाहने ओव्हरलोड स्थितीत सुसाट धावत असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. काही वाहनांवर क्रमांकफलक नसल्यामुळे अपघात झाल्यास संबंधित वाहन ओळखणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

गौण खनिजांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी गाव पातळीवर तलाठी यांच्यावर असते. परवानगीप्राप्त उत्खनन परवान्याच्या अटींचे पालन होत आहे की नाही याची पाहणी करून नियमित अहवाल तहसील कार्यालयात सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात कमी ब्रासची रॉयल्टी भरून अनेकपटींनी उत्खनन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही ठिकाणी नावापूर्ते रॉयल्टी भरली जाते; परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कित्येक पटीने मुरूम काढला जात असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर अवैध उत्खननाला काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. केवळ चौकशीचा फसवणुकीचा धोरण न ठेवता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला असता, "तलाठींकडून चौकशी करून माहिती घेतो," असे त्यांनी सांगितले. 

परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची शक्यता व्यक्त होत असून, महसूल विभागाने तातडीने ॲक्शन मोडवर येऊन कडक पावले उचलावीत, अशी मागणी लोकांनी केली आहे.

Web Title : अवैध मुरम खनन से जुन्नर में करोड़ों का राजस्व नुकसान

Web Summary : जुन्नर के आलेफाटा क्षेत्र में अवैध मुरम खनन से भारी राजस्व नुकसान हो रहा है। स्थानीय लोगों के अनुसार, भ्रष्ट अधिकारियों की मिलीभगत से रात और सप्ताहांत में बड़े पैमाने पर खुदाई और परिवहन हो रहा है। ग्रामीणों ने शामिल लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है।

Web Title : Illegal Murrum Mining Causes Crores in Revenue Loss in Junnar

Web Summary : Illegal murrum mining in Junnar's Alephata region is causing significant revenue loss. Locals report rampant excavation and transport, especially at night and weekends, facilitated by corrupt officials. Villagers demand strict action against those involved to stop the illegal activities.