राहुल गांधींचा व्हिडिओ डिलीट करू नये;सात्यकी सावरकर यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:07 IST2025-09-26T10:02:39+5:302025-09-26T10:07:33+5:30
- विशेष न्यायालयाने सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांना भाषणाचा तो व्हिडीओ यूट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा आदेश देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला.

राहुल गांधींचा व्हिडिओ डिलीट करू नये;सात्यकी सावरकर यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
पुणे : तक्रारदारांना त्यांचे पुरावे सादर करावे लागतील आणि त्यांचा खटला सिद्ध करावा लागेल. या टप्प्यावर, हे न्यायालय फौजदारी दंडाच्या कलम २०२ अंतर्गत कोणताही आदेश देण्यासाठी मागे जाऊ शकत नाही. आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा फायदा घेतला जाऊ शकत नाही.
आरोपीला व्हिडिओ हटविण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. आरोपींचे वैयक्तिक स्वातंत्र्य मर्यादित करता येत नाही, असे स्पष्टपणे नमूद करीत, विशेष न्यायालयाने सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांना भाषणाचा तो व्हिडीओ यूट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा आदेश देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. गांधी यांनी जे बदनामीकारक वक्तव्य केले होते ते भाषण यूट्यूबवर दिसून येत आहे. विश्रामबाग पोलिस यांनी त्यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीला समन्स पाठवून तसा तांत्रिक तपास केला होता. परंतु तो तांत्रिक तपासाचा अहवाल अद्याप न्यायालयात दाखल नाही.
तो अहवाल पोलिसांकडून मागवावा. तसेच गांधी यांना या न्यायालयाने आदेश द्यावेत, की तो भाषणाचा व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट करू नये, असा अर्ज केला होता. सावरकर यांच्या अर्जावर राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी विरोध केला होता. विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी अॅड. मिलिंद पवार यांचा युक्तिवाद मान्य करून फिर्यादी सावरकर यांचा अर्ज फेटाळून लावला. याकामी अॅड. अजिंक्य भालगरे, अॅड. सुयोग गायकवाड अॅड. हर्षवर्धन पवार यांनी मदत केली. पुढील सुनावणी दि. ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.